आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाच्या दहा कोटींच्या निधीमधून प्रस्तावित करण्यात आलेली कामे सुरू करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील वर्षी ठेकेदाराला पत्र दिले होते. स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनही ठेकेदाराने काम केलेली नाही. त्यामुळे ठेकेदार संस्था ए. सी. कोठारी यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी ऋषिकेश गुंडला यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शहराच्या मध्यवर्ती परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. तोफखाना परिसरातील अनेक कामे शासनाने मंजूर केलेल्या दहा कोटींच्या निधीमधून प्रस्तावित आहेत. ठेकेदाराकडून वारंवार कामे करण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांनी मागील वर्षीच ठेकेदार संस्थेला तात्काळ काम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही ठेकेदाराने काम केलेले नाही.
त्यामुळे ठेकेदार संस्थेच्या मागील दहा वर्षातील सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेतील कामाबाबत सर्वे करून ठेकेदार रसिकलाल कोठारी व त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने असलेल्या इतर ठेकेदार संस्थांना काळ्या यादीत टाकावे. ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याची अनामत रक्कम जप्त करावी. नवीन ठेकेदाराला काम देऊन प्रलंबित काम तत्काळ मार्गी लावावे, अशी मागणी तोफखाना परिसरातील ऋषिकेश गुंडला व नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, मागील आठवड्यातच महापालिका प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावानुसार सर्वसाधारण सभेमध्ये या विषयावर जोरदार चर्चा झडली. शासनाच्या दहा कोटी रुपयांच्या निधीतील कामे मार्गी लावण्यासाठी मनपाकडून काही प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून या संदर्भात पत्र व्यवहार झाल्यानंतर प्रशासन पुढील निर्णय घेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.