आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नप्रक्रिया उद्योग:नगर जिल्ह्यात 30 जणांनी उभारले सुमारे 6 कोटींचे अन्न प्रक्रिया उद्योग ; सर्वाधिक दूध पक्रिया प्रकल्प

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाचा कृषी विभाग व आत्मा प्रकल्पांतर्गत केंद्र शासन अर्थसहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत नगर जिल्ह्यात ३० तरुणांनी तब्बल सहा कोटींचे उद्योग उभारले आहेत. त्यात सर्वाधिक २० प्रकल्प दूध प्रक्रियेवर आधारीत आहेत. वैयक्तिक लाभार्थ्यांना यासाठी ३५ टक्के अनुदान तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना दहा लाखांपर्यंत कर्जपुरवठा करण्यात आला आहे. राज्य शासनाचा कृषी विभाग व आत्मा प्रकल्पांतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उन्नयन योजना २०२०-२१ पासून सुरू झाली असून,ती २०२४-२५ पर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेत सुरुवातीला एक जिल्हा एक उत्पादन अशी अट होती, परंतु ही अट आता शिथिल करण्यात आली. त्यामुळे ३० मे २०२२ अखेर या योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगार, संस्था आदींनी ५९९ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६० अर्ज फेटाळून ३० प्रकरण मंजूर करण्यात आले. जिल्ह्यासाठी २९७ प्रकल्प उभारणीचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी ३० प्रकरणांना कर्जपुरवठा मंजूर झाला. दरम्यान, या योजनेसाठी उद्योग उभारणीला मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी संसाधन व्यक्तींची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. हे मार्गदर्शक कर्ज प्रकरण मंजुरी ते प्रकल्प उभारणीपर्यंत मार्गदर्शन करणार आहेत. उद्योग उभारणीला चालना मिळाल्याने बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

येथे उभारले उद्योग : जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यामध्ये सर्वाधिक ११ उद्योगांना कर्ज पुरवठा झाला असून प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. पाथर्डी तालुक्यात ३, राहुरी व नगर तालुक्यात प्रत्येकी ५, तर कर्जत, पारनेर, राहाता, नेवासे, संगमनेर व श्रीरामपूर येथे प्रत्येकी एक असे ३० प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

दुग्ध प्रक्रियाकडे कल नगर जिल्ह्यात एकूण ३० प्रकल्पापैकी २० प्रकल्प दूध प्रक्रियेवरील आहेत. यामध्ये २ प्रकल्प तेलबिया प्रक्रिया, ज्वारीवरील पापड, कडधान्य प्रक्रिया, शेंगदाणा चिक्की, बटाटा चिप्स, मसाले व हळद प्रक्रिया, आवळा कँडीचे २, मसाले व लोणचे या उद्योगाचा समावेश आहे.

प्रत्येक गावात ३ उद्योग शक्य प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार, नवउद्योजक, महिला बचत गट, शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, सहकारी व खासगी संस्था यांना अर्ज करता येईल. उत्पादनाच्या ३० टक्के नाशवंत होणाऱ्या मालावर प्रक्रिया करून नुकसान टाळता येणार आहे. या योजनेतून प्रत्येक गावात ३ ते ४ उद्योग उभारले जाऊ शकतात. शेतमालावरील भावाची अडचण संपुष्टात येऊन साठवणूक, ग्रेडिंग, पॅकेजिंग, शेतकऱ्यांच्या गटांना स्मार्ट प्रकल्प आधारित उद्योग सुरू करता येऊ शकतात. - राजाराम गायकवाड, जिल्हा नोडल अधिकारी, पीएमएफएमई तथा प्रकल्प उपसंचालक, आत्मा. योजनेतून उद्योग उभारला स्वतःचा उद्योग उभारण्याची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आम्हाला कर्ज मंजूर झाले. यातून १० लाख रुपये खर्चाचा मसाले, लोणचे व सेंद्रिय खपली गहू उत्पादनाचा उद्योग उभारला. आमची ही उत्पादने ॲमेझॉनवरही विकले जातात. नवीन उद्योग असल्याने वर्षभरात एक ते सव्वालाखांचा टर्नओव्हर होतो. -संगीता मारुती डाके, नवीन उद्योजक, श्रीगोंदे.

बातम्या आणखी आहेत...