आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकारेगाव व अशोकनगर (ता. श्रीरामपूर) तसेच नगर तालुक्यात नागरिकांना मारहाण करून जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यांच्याकडून ९ लाख ७५ हजार रुपयांचे साडेअकरा तोळे दागिने व एक तवेरा गाडी हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
आर्यन ऊर्फ एरीयल ऊर्फ काळु कांतीलाल काळे (वय २६), विदेश नागदा भोसले (वय १९, दोघे रा. नवापुरवाडी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), भोईट्या ऊर्फ डसल्या ऊर्फ आदित्य कांतीलाल काळे (वय २९, रा. मानगल्ली, नेवासे फाटा, ता. नेवासे) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या संख्येत वाढ होऊ शकते, असेही ओला यांनी सांगितले.
श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे जबरी चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना विशेष पथक नियुक्त करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. काही संशयीत व्यक्ती चोरीचे सोने विक्री करण्यासाठी औरंगाबादकडून नगरकडे येणार असल्याची माहिती कटके यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार पथकातील अधिकारी व अंमलदारांनी खडका फाटा (ता. नेवासे) येथे जाऊन सापळा रचला. पथकाने संशयित गाडी थांबवताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्यांचा पाठलाग केला मात्र, ते पसार झाले. त्याचवेळी पथकातील इतरांनी थांबलेल्या वाहनातील तीन इसमांना जागीच पकडून ताब्यात घेतले. गाडीत सोन्याचे दागिने मिळून आले. त्यांनी श्रीरामपूर व नगर तालुका परिसरात घरात घुसून मारहाण करून चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. पुढील कारवाई श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशन करीत आहे.
आरोपींविरुद्ध २५ गुन्हे दाखल
आरोपी आर्यन ऊर्फ एरीयल ऊर्फ काळू कांतीलाल काळे याच्या विरोधात शिलेगाव (गंगापूर, जि. औरंगाबाद), गंगापूर (जि. औरंगाबाद), वैजापुर (जि. औरंगाबाद), नगर जिल्ह्यातील कर्जत, नेवासा, श्रीगोंदे, राहाता, शनिशिंगणापूर, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, नगर तालुका आदी पोलिस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत. विदेश नागदा भोसले विरोधात गंगापूर (जि. औरंगाबाद), श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, नगर तालुका आदी पोलिस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत. तर भोईट्या ऊर्फ डसल्या ऊर्फ आदित्य कांतीलाल काळे याच्या विरोधात श्रीगोंदे, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, नगर तालुका, तसेच वाळूंज (जि. औरंगाबाद) पोलिस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत.
या पथकाने केली कारवाई सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, पोसई विठ्ठल पवार, पोसई संदीप ढाकणे, पोसई विजय भोंबे, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, भिमराज खसे, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, पोकॉ विनोद मासाळकर, जालिंदर माने, सागर सरवणे, विजय धनेश्वर, रविंद्र पुंगासे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, सारीका दरेकर, पोहेकॉ उमाकांत गावडे, बबन बेरड, संभाजी कोतकर व भरत बुधवंत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.