आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतातील चार दिशांच्या महत्त्वाच्या मेट्रो शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून 6400 किलोमीटर अंतर केवळ 18 दिवसांत बुलेटवरुन पार करण्याचा विक्रम मूळचे नगर जिल्ह्यातील मिरजगावचे रहिवासी असलेले संतोष होनकर्पे आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी केला. या पाच बाइक रायडर्सच्या पराक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात अशी 12 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात घोडदौड करत त्यांनी गोल्डन क्वेअड्रिलेटरलचा प्रवास पूर्ण केला. होनकर्पे यांच्यासह गजानन सरकाळे, भरत जाधव, अथर्व कोकिळ, अमोल मोरे हे या मोहिमेत सहभागी झाले होते. पुण्यातील रॉयल बुलेटीयर्स बाईक रायडिंग क्लबचे ते सदस्य आहेत.
बारा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात आम्ही गोल्डन क्वेअड्रीलेटरलचा प्रवास पूर्ण केला. ही कामगिरी करताना आम्ही देशातील महत्त्वाच्या औद्योगिक, शेतकी, सांस्कृतिक, धार्मिक स्थळांना भेटी देऊन त्याचे वृत्तांकन सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर पोहोचवले, असे होनकर्पे यांनी सांगितले.
क्लीन इंडिया ग्रीन इंडिया हा संदेश देत त्यांनी हा प्रवास केला. सुवर्ण चतुष्कोण हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे आहे. बुलेटवर प्रवास करताना अतिशय जोखीम पत्करत केलेल्या या संपूर्ण प्रवासाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली. सर्वांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड प्रशस्तीपत्र मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
अथर्व ठरला सर्वात लहान रायडर
अथर्व कोकीळ हा 21 वर्षाचा तरुण सुवर्ण चतुष्कोण राईड पूर्ण करणारा सर्वात तरुण ठरला. 62 वर्षांचे भरत जाधव हे सर्वात जास्त वयाचे सुवर्ण चतुष्कोण बाईकवरुन पूर्ण करणारे रायडर ठरले. हा इतिहास इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2023 मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.