आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:विद्यार्थ्यांच्या कुतुहलापोटी संगीत शिक्षकाने अल्पखर्चात बनवली बुलबुल

महेश पटारे | नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत मुलांना शिकवत असताना फक्त चित्र दाखवून किंवा वर्णन करून सांगणे उपयोगाचे नाही, तर प्रत्यक्षात त्या वस्तू पहायला व हाताळायला मिळाल्या, तर त्यांच्या ज्ञानात खऱ्या अर्थाने भर पडते. त्यांना विज्ञानाची, संशोधनाची गोडी लागते. या भावनेतून डॉन बॉस्को विद्यालयातील संशाेधक वृत्तीचे उपक्रमशील शिक्षक कमलेश गमरे यांनी अवघ्या सव्वीसशे रुपयांत इलेक्ट्रॉनिक बुलबुल (बँजो) तयार केली. नगरमध्ये तयार झालेली ही पहिलीच बुलबुलअसावी. कमलेश गमरे विद्यार्थ्यांना संगीत, इतिहास, भूगोल, संगणक, खेळ आदी विषय शिकवतात. गेल्या तेरा वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत. लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्यांना २०० रुपयांची बुलबुल आणली होती. तेव्हापासून त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. त्यांना लहानपणापासून हार्माेनियम, गिटार, बासरी, ढोल, ढोलकी, कॅसिओ, माऊथ ऑर्गन व बुलबुल ही वाद्ये वाजवता येतात.

शाळेत संगीत विषय शिकवताना विद्यार्थ्यांनी बुलबुल म्हणजे काय, असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांना प्रत्यक्षात हे वाद्य दाखवावे, असा विचार गमरे यांच्या मनात आला. त्यांची संशोधक वृत्ती जागी होऊन अवघ्या १५ ते २० दिवसांत त्यांनी घरीच हे वाद्य तयार केले. रिडाच्या स्प्रिंग, दुचाकीच्या क्लचच्या वायरच्या तारा, बाजारात मिळणारी बटणं, फोमचं लाकूड, यांच्या साह्याने त्यांनी २९ स्वरांची बुलबुल तयार केली.

नगर शहरात जवळपास सर्वच वाद्ये विकत मिळतात, तसेच काही तयारही होतात. तसे खास कारागीरही नगर शहरात आहेत. पण, बुलबुल तयार करणारे कोणीही नाही. कोणाला हवी असेल, तर वाद्यविक्रेते ती बाहेरून मागवतात. कलकत्ता, उत्तर प्रदेश, बिहार, नवी दिल्ली येथे बुलबुल वाद्य बनवले जाते. सध्या ऑनलाईन बाजारात १४ ते १६ हजार रुपयांत हे वाद्य उपलब्ध आहे. पण गमरे यांनी घरात उपलब्ध टाकाऊ वस्तूंपासून बुलबुल तयार केली. तसेच पाण्याच्या ३५ लीटरच्या ड्रमला स्पीकर बसवून तिला इलेक्ट्रिक स्वरुप दिले. सन १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कर्मा या हिंदी सिनेमात ‘हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए’, या गाण्यात दाखवलेली बुलबुल व वाजवलेली धून अद्यापही रसिक विसरलेले नाहीत. गमरे आपल्या बुलबुलवर ही धून तंतोतंत वाजवून दाखवतात. गमरे यांनी यापूर्वी घरीच इलेक्ट्रिक बाईक, इनक्युबेटर यंत्र, यांसारखी उपकरणेही तयार केलेली आहेत.

संशोधनाला प्रशासकीय पातळीवर पाठबळ मिळावे
भारतीयांमध्ये मुळातच संशोधक वृत्ती आहे. जगातल्या अनेक गोष्टींचे शोध भारतीयांनी लावले आहेत. सध्या मात्र अशा संशोधक व चिकित्सक वृत्ती लोप पावत चालली आहे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये जर अशी वृत्ती असेल, तर तिला चालना मिळायला हवी, तसेच तिला प्रशासकीय पातळीवर पाठबळही मिळायला हवे. शाळा महाविद्यालयांत तयार केले जाणारी उपकरणे प्रत्यक्षात साकारता आली. तर नवे शोध लागू शकतात.
कमलेश गमरे, शिक्षक, डॉन बॉस्को विद्यालय.

बातम्या आणखी आहेत...