आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोळीचा सण जसा रंगांचा तसा राजकारणाचा उत्सवही नाना प्रकारच्या रंगांचा.. अपेक्षा जशा वाढत जातात, तसे राजकारणी आपला रंग बदलत जातात. फक्त वाट पाहायची असते ती योग्य वेळ येण्याची. नगरच्या राजकारणात आता तशी वेळ आलेली आहे.
अरुण काका जगताप यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विधानपरिषदेची राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा आता रिकामी झाली आहे आणि त्या जागेवर डोळा ठेवून आहेत भाजपचे नेते राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून झडताहेत पण काल अचानक राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि शिवाजीराव कर्डिले यांची रस्त्यात अशी भेट झाली. विचारपूस झाली आणि ‘चाय पे चर्चा’ चांगलीच रंगली. या भेटीत राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनी कर्डिले यांना राष्ट्रवादी प्रवेशाचे निमंत्रण दिले की काय? या चर्चेबरोबरच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या अॅड. ढाकणे यांना सध्या भाजपत असलेल्या कर्डिले यांनी पुन्हा भाजप प्रवेशाचे आमंत्रण दिले की काय? अशीही चर्चा सुरू झाली आहे.
अॅड. प्रताप ढाकणे आणि शिवाजी कर्डिले यांनी पक्षीय राजकारणाचे रंग तसे बरेच बदलले आहेत. ढाकणे यांचे वडील बबनराव ढाकणे जनता दलाचे नेते. नंतर त्यांची शरद पवार यांच्याशी जवळीक झाली ते राष्ट्रवादीचे नेते म्हणूनही ओळखले जाऊ लागले. कालांतराने अॅड. प्रताप ढाकणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि जिल्हाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली. परंतु नंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
कर्डिले हे तसे अपक्ष आमदार होते. नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी आमदार झाले आणि त्यानंतर त्यांनी पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली. राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या भाजपमध्येच आहेत. अशा दोन्ही नेत्यांनी एकमेकांना रंग बदलण्याचं दिलेलं हे आमंत्रण सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय होऊन बसले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.