आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नव्याने सुरू होणाऱ्या महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाचे मुख्यालय नगर जिल्ह्यातील ढवळपुरी (ता.पारनेर) येथे होणार आहे. या प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. ढवळपुरी येथील ३५ एकर गायरान जागेवर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून शेळी व मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना ७० टक्के बीज भांडवलाद्वारे कर्ज उपलब्ध होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी,मेंढी महामंडाकडून ढवळपुरी येथे हा प्रकल्प सुरू होणार आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्या सहाय्याने हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. नगरसह राज्यभरातील बारा लाख लाभार्थी यांना शेळी मेंढी पालन करण्यासाठी भांडवल या प्रकल्पातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. अत्याधुनिक प्राणी प्रजाती निर्मिती, शास्त्रोक्त पालन मिशन व प्रक्रिया याची सांगड या प्रकल्पात घातली जाणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात नगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस
अर्थसंकल्पात शेतीमालाला रास्त भाव देण्याबद्दल ब्र शब्द काढण्यात आलेला नाही. कांदा, कापूस, सोयाबीन, चिकन, अंडी, तूर, हरभरा पिकांचे भाव कोसळत असताना ते सावरण्यासाठी कोणतीही योजना आणलेली नाही. शेतीमालाला रास्त दाम मिळावे यासाठी ठोस तरतूद केलेली नाही.शेतकऱ्यांनी जे कधीच मागितलं नव्हते ते शेतकऱ्यांना देऊन आम्ही शेतकऱ्यांसाठी किती चांगले करतोय असे दाखवण्याचा प्रयत्न करायचा असा हा प्रकार आहे. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल देत सवंग लोकप्रियता आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या या घोषणा आहेत.- डॉ. अजित नवले, केंद्रीय सहसचिव भाकप.
पंचामृताचे नाव देऊन राज्यातील जनतेसोबत धोका
अर्थसंकल्पात शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे फुलवण्यात आले आहे. ज्या गोष्टी सत्यात उतरूच शकत नाही, अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. एकीकडे अवकाळी पाऊस, दुसरीकडे अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस यामुळे महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. पंचामृताचे नाव देऊन महाराष्ट्रातील जनतेसोबत धोका करण्यात आला. या अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्रातला शेतकरी, तरुण, महिला, मध्यमवर्गीय मोठ्या आशेने बघत होता. शेतकऱ्यांसाठी कोणतेही रचनात्मक पाऊल या अर्थसंकल्पात दिसत नाही. वास्तव आणि सत्याचे भान विसरलेला आणि निव्वळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्या, घोषणांच्या खैरातीचे वाटप आज करण्यात आले. - बाळासाहेब थाेरात, आमदार.
सरकारकडून जुन्या पेन्शन बाबत ठोस भूमिका गरजेची
शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. घोषणा आणि वस्तुस्थिती यामध्ये मोठा फरक असून अर्थसंकल्पात जुन्या पेन्शन बाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.
सर्वच घटकांना प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प
शेतकऱ्यांसह समाजातील सर्वच घटकांना प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प आहे. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येय युक्त असलेला अर्थसंकल्प जनभागीदारीतून तयार झाला.शाश्वत शेती हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास , रोजगारनिर्मिती, सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास अशा बाबी अर्थसंकल्पात आहेत.- अरुण मुंढे, जिल्हाध्यक्ष, दक्षिण भाजप.
गरीब, शेतकऱ्यांचे कल्याण करणारा अर्थसंकल्प
अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर व ‘सर्वजन हिताय’ या संकल्पनेवर आधारित आणि सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, शेतमजूर,कामगार, उद्योजक, युवक, महिला अशा सर्व क्षेत्रातील लोकांचा व समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करण्यात आलेला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबविण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे. हा अर्थसंकल्प गरीबांचे, कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे कल्याण करणारा आहे. - स्नेहलता कोल्हे, प्रदेश सचिव,भाजप.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.