आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावपळ:मिरवणुकीच्या शक्यतेने पोलिसांची धावपळ

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिपू सुलतान जयंतीच्या पार्श्वभूमीवर हद्दपार आदेशाची नोटीस बजावून परतणाऱ्या पोलिस अंमलदारांना अडविण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी मुकुंदनगर परिसरात घडली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या सरफराज मोहम्मद इब्राहीम सय्यद ऊर्फ सरफराज जहागीरदार (रा. मेहराज मस्जिद, मुकुंदनगर) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मिरवणुकीला परवानगी नसतानाही आशा टॉकीज चौकात एकत्र जमण्याचे मेसेज व्हायरल झाल्याने कोतवाली पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

शहरात टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याच्या तयारीत असलेल्या १२ जणांना तीन दिवसांसाठी नगर शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. यात सरफराज मोहम्मद इब्राहीम सय्यद ऊर्फ सरफराज जहागीरदार याचाही समावेश आहे. त्याला नोटीस देण्यासाठी पोलिस अंमलदार व त्यांचे सहकारी शनिवारी सायंकाळी मुकुंदनगर येथे गेले होते. हद्दपार आदेशाच्या नोटीसीची बजावणी करून ते कोतवाली पोलिस ठाण्याकडे परत येत असताना सरफराज हा त्यांच्या दुचाकीला आडवा झाला. त्याने दुचाकी पुढे नेण्यास पोलिसांना प्रतिबंध करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस नाईक अब्दुलकादर परवेज इनामदार (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार जी.जी.गोर्डे करीत आहेत.

दरम्यान मिरवणुकीस परवानगी नाकारलेली असताना व बारा जणांना शहरातून हद्दपार करण्यात आलेले असतानाही टिपू सुलतान जयंती निमित्त आशा टॉकीज चौकात दुपारी चार वाजता एकत्र जमावे, असे संदेश सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यामुळे कोतवाली पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. मिरवणूक काढण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने खुटवली पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक न निघाल्याने पोलिसांनीही सुटकेचा श्वास सोडला.

बातम्या आणखी आहेत...