आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवाची तयारी शिगेला:शहरात गणेश मुर्त्यांसह पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी; बप्पांच्या आगमनापूर्वी जल्लोष अन् उत्साह

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशीपासून अर्थात बुधवार (31 ऑगस्ट) पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अहमदनगर शहरासह उपनगरांमध्ये मंगळवारी गणेशोत्सवासाठीची लगबग सुरु आहे.. शहरातील विविध भागात मंगळवारी गणेशमूर्ती घेण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. विशेषतः अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरांमध्ये दुपारपासून गणेश मूर्ती खरेदीसाठी गर्दी वाढली. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी लागणारे पूजेचे व अन्य साहित्य खरेदीसाठीही उत्साह शिगेला पोहोचलेला होता.

उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गेल्या आठ दिवसापासून शहर व परिसरात गणेश उत्सवाची सार्वजनिक गणेश मंडळांनी तयारी सुरू केली होती. मंगळवारी ती तयारी पूर्ण झाली असून, बुधवारी श्री गणेशाचे आगमन होणार आहे. शहरातील सावेडी, केडगाव ,भिंगार ,नवनागापूर, सर्जेपुरा, माळीवाडा यासह अन्य भागात सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी मंडप टाकण्याचे काम सुरू केले होते. ते काम आता पूर्ण झाले आहे. गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने घरगुती गणेशोत्सवाची घरोघरी लगबग सुरू होती.

घराघरात गणेश उत्सवासाठी आरस करण्याचे काम सुरू होते. मंगळवारी शहरासह उपनगरांमधील गणेश मूर्ती घेण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. यंदा नगरकरांकडून मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना सर्वाधिक मागणी होती. विशेष म्हणजे अहमदनगर शहरातील विविध कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या गणेश मूर्ती या राज्यासह अन्य भागात विक्रीसाठी जात असतात. मंगळवारी देखील कारागीर गणेश मुर्त्यांवर शेवटचा हात फिरवताना दिसत होती.

घरोघरी आरास तयार करण्याची लगबग

श्री गणेशाचे आगमन उद्या होणार असल्यामुळे घरोघरी गणेशोत्सवाची तयारी सुरू होती. बाजारातून तयार आरास घेण्यासाठी अनेकांची लगबग सुरू होती. त्याचबरोबर घरातच आरास तयार करण्यावरही अनेकांचा भर होता. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिना दोन महिन्यापूर्वी बुकिंग केलेल्या गणेश मुर्त्या घेऊन जाण्याची सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...