आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार:शिरसगावातील दहा लाखांचा रस्ता अवघ्या दोन लाख रुपयांत उरकला

श्रीगोंदे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील चिंभळे रस्ता ते गोंटे वस्ती रस्त्यासाठी आमदार निधीतून आलेल्या दहा लाख रुपयांच्या निधीचा रस्ता ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून निधी गिळंकृत केला असून दोन लाखाचे काम केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

मढेवडगाव- चिंभळा रस्त्यापासून गोंटे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांचा निधी टाकला. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत अंदाजपत्रक तयार केले. ठेकेदाराने अंदाजपत्रकानुसार काम करणे गरजेचे असताना केवळ मलमपट्टी करून रस्ता केला. अंदाजपत्रकात साईडपट्ट्या उकरणे गरजेचे असताना त्या उकरल्या नाहीत.

ठिकठिकाणी नळ्या टाकण्याची तरतूद असतानाही कोठेही नळ्या टाकल्या नाहीत. तसेच खडीकरणा अगोदर मुरुमीकरण १०० मीमी करण्याची तरतुद अंदाजपत्रकात असतानाही कोठेही मुरुमीकरण झाले नाही. आणलेली खडी निकृष्ट दर्जाची असून त्यावर आणलेला मुरूम पूर्णपणे माती मिश्रित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदाराने दहा लाखांच्या निधीवर पाणी फिरवले असून या संपूर्ण कामाची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्या वैशाली गवते, सुनीता चौधरी, भिवाबाई कोळपे यांनी दिलेल्या तक्रारीत केली असून तक्रारीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीगोंदे, अभियंता अहमदनगर, मुख्य अभियंता नाशिक व गुणनियंत्रण विभाग नाशिक, सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई व मुख्य सचिव मंत्रालय यांना दिले. काम संपले नाही, आज किंवा उद्या रावसाहेब पिंगळे समक्ष साईटवर येऊन पाहणी करून मंजुरीप्रमाणेच काम करून घेतील, याची खात्री बाळगा ही विनंती, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...