आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीज कायदा 2003 नुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक आहे. ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी अहमदनगर जिल्ह्यातील लघुदाब वर्गवारीतील 3 लाख 8 हजार 88 वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीवर व्याजाच्या रुपाने 2 कोटी 29 लाख 88 हजार रुपयांचा रुपयांचा परतावा त्यांच्या एप्रिल महिन्यातील वीज बिलातून देण्यात आला.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. वीज आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता 2011 च्या विनिमय 13.1 नुसार वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते.
याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती. आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे.
विनिमय 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते.
जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी अहमदनगर मंडळा अंतर्गत अहमदनगर ग्रामीण विभागातील 44 हजार 7 ग्राहकांना 28 लाख 76 हजार, अहमदनगर शहर विभागातील 1 लाख 12 हजार 832 ग्राहकांना 92 लाख 97 हजार, कर्जत विभागातील 32 हजार 248 ग्राहकांना 22 लाख 71 हजार, संगेमनेर विभागातील 92 हजार 955 ग्राहकांना 64 लाख 41 हजार, श्रीरामपूर विभागातील 26 हजार 46 ग्राहकांना 21 लाख 2 हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. अशी एकूण अहमदनगर जिल्ह्यात 3 लाख 8 हजार 88 ग्राहकांना 2 कोटी 29 लाख 88 हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.
एप्रिलमध्ये दिले होते सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल
एप्रिलमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.