आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:मदारी वसाहतीच्या कामासाठी डोंबाऱ्याचा खेळ करत आंदोलन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मदारी वसाहतीचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी डोंबारी समाजातर्फे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अभिनव आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पाल ठोकून मदारी समाजाने डोंबारी खेळ करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. वन्यजीव कायद्याअंतर्गत साप पाळण्यावर बंदी आहे. त्यामुळे प्लास्टिकचा साप टोपलीत ठेवून खेळ दाखवण्यात आले. दरम्यान, सहायक समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते, तथा भटके विमुक्त आदिवासी विकास आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाजाने हे आंदोलन केले. आंदोलनात लोकाधिकारचे प्रवक्ते बापू ओहोळ, विशाल पवार, आतीश पारवे, आजिनाथ शिंदे, हुसेन मदारी, सलीम मदारी, सरदार मदारी, फकीरा मदारी, गणपत कराळे, सचिन भिंगारदिवे, मुस्तफा मदारी, मोहम्मद मदारी, रेश्मा मदारी, शहाजान मदारी आदी सहभागी झाल्या होत्या.

खर्डा (ता. जामखेड) येथे मदारी समाजाच्या कुटुंबासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत १ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवासी वसाहतीचा निर्णय झाला होता. मात्र, ६ वर्षे उलटूनही वसाहतीचे बांधकाम सुरू झालेले नाही. याबाबत मदारी समाजाने तहसीलदार, गटविकास अधिकारी कार्यालयासमोर ६ वेळा आंदोलने केली. भूमिहीन मदारी समाजाला अनेक वर्षांपासून राहण्यासाठी घरे नाहीत. डोंबारी खेळ सादर करीत, मदारी समाजाला घरे बांधून देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सरकारने सकारात्मक विचार करावा : मदारी
वन्यजीव कायद्याअंतर्गत कोणताही वन्य प्राणी पाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचा परिणाम मदारी समाजावर झाला आहे. त्यामुळे बहुतांश मदारी समाजाला प्लास्टिकचे साप दाखवून डोंबाऱ्याचे खेळ सादर करावे लागतात. त्यामुळे जादूचे प्रयोग पाहण्यासाठी लोक कमी प्रमाणात येतात, याबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी सरदार मदारी यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...