आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनविभाग:जिल्ह्यात 12 वर्षांनंतर पुन्हा बिबट निवारा केंद्राचा प्रस्ताव ; प्रशासकीय उदासीनतेमुळे बारगळला

नगर / दीपक कांबळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यात श्रोगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथे बिबट निवारा केंद्र (लिपर्ड रेस्क्यू सेंटर) उभारणीचा प्रस्ताव मंजूर होऊन, त्यासाठी ३ कोटींचा निधी आला होता. परंतु, तत्कालीन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा निधी माघारी गेला. आता पुन्हा बिबट्यांच्या वाढत्या संख्येचा विचार करून १२ वर्षानंतर पुन्हा एकदा नव्याने प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभा राहिल्यास बिबट्यांना हक्काचा निवारा मिळेल, तसेच पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

बिबट्यांच्या संगोपन व उपचारासाठी बेलवंडी येथे १६ कोटींचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते. तत्कालीन पालकमंत्री तथा वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. त्यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात २०११ मध्ये ३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु, तत्कालीन अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा निधी अखर्चीत राहिल्याने परत गेला होता. त्यामुळे हा प्रकल्प बारगळला होता. नगर जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या पाहता, हा प्रकल्प आवश्यक आहे. त्यामुळे उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्यांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे ६०० बिबटे असल्याचा अंदाज आहे. मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

राज्यात असा प्रकल्प कुठे ?
राज्यात जुन्नर येथे एकमेव बिबट निवारा केंद्र आहे. या केंद्राच्या विस्तारीकरणासाठी प्रयत्न होत आहेत. २००२ मध्ये जुन्नर तालुक्यात माणिक डोहबिबट निवारा केंद्र सुरू करण्यात आले. बिबट्याची वाढती संख्या पाहता, या केंद्राच्या विस्तारीकरणाची गरज आहे.

प्रकल्पाचा फायदा काय होईल ?
विहिरीत पडून अथवा अपघातातून बिबटे जखमी होतात. जखमी बिबट्यांवर येथे उपचार करता येतील. पर्यटनालाही चालना मिळू शकते. राज्यात जुन्नर नंतर हा दुसरा प्रकल्प ठरणार आहे.

बिबट सफारी प्रकल्पही रखडला
बिबट निवारा केंद्राचा प्रकल्प बारगळल्यानंतर वनविभागाने बिबट सफारीसाठी प्रस्ताव पाठवला होता. परंतु, या प्रकल्पालाही अंतिम मंजुरी मिळाली नाही.

प्रकल्पासाठी वनमंत्र्यांना भेटणार
आम्ही त्यावेळी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला होता. प्रकल्प उभा राहिला तर तेथे पर्यटनाला चालना मिळेल. हा प्रकल्प उभा राहावा यासाठी मी वनमंत्र्यांना पत्र देणार आहे. प्रकल्प उभारणीचा निश्चय केला, सर्व परवानग्या मिळतील.
बबनराव पाचपुते, माजी वनमंत्री.

बातम्या आणखी आहेत...