आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनाचा अभाव:25 वर्षांनंतर झालेला रस्ता तीन महिन्यांतच खोदला ; ​​​​​​​मनपानेच दिली परवानगी

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाइपलाइन हाडको परिसरात तब्बल २५ वर्षांनंतर नव्याने करण्यात आलेला रस्ता अवघ्या तीन महिन्यांतच विजेची केबल टाकण्यासाठी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. संतप्त झालेल्या माजी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांनी खड्ड्यात ठिय्या देऊन रस्ता फोडणाऱ्या व परवानगी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे महापालिकेनेच ‘म्हाडा’ला रस्ता खोदण्यासाठी परवानगी दिल्याचेही समोर आले आहे.

महापालिकेकडे विकास कामांसाठी निधी उपलब्ध नाही. परिणामी अनेक ठिकाणी नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अशात नगरसेवक प्रभागातील रस्ते करण्यासाठी राजकीय शक्ती पणाला लावून निधी उपलब्ध करून घेतात. अशाच पद्धतीने पाइपलाइन हडको परिसरात रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला होता. २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम तीन महिन्यापूर्वी करण्यात आले. त्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च करण्यात आला. मात्र, अवघ्या तीन महिन्यातच नव्याने केलेला हा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने दोन ठिकाणी खोदण्यात आला आहे. म्हाडाच्या नवीन इमारतीचे काम सुरू असून विजेची केबल टाकण्यासाठी महापालिकेने रस्ता खोदण्याची परवानगी दिली आहे.

रस्ता खोदण्यास सुरुवात होताच वारे व पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन काम थांबवले. विजेची केबल टाकण्यासाठी रस्ता न खोदता पर्यायी व्यवस्था करणे शक्य होते. तसेच रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी रस्ता क्रॉसिंगची कामे करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. म्हाडाच्या इमारतीचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. रस्ता होईपर्यंत त्यांचे अधिकारी झोपले होते का? नव्याने झालेला रस्ता खोदण्यासाठी महापालिकेने परवानगी दिलीच कशी? असा सवाल करत वारे व पवार यांनी खड्ड्यामध्ये ठिय्या देत आंदोलन सुरू केले. रस्ता खोदणाऱ्या व परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, रस्त्याचे काम पुन्हा करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.