आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहामार्ग दुरुस्तीसाठी आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेले उपोषण शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले. थेट केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी अजित पवार यांच्या माध्यमातून झालेल्या चर्चेनंतर व लेखी आश्वासनानंतर लंके यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, उपोषणस्थळी बोलताना पवार यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर बोलणे टाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमदार लंके यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. शनिवारी अजित पवार यांनी उपोषणस्थळी आमदार लंके यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, क्षितिज घुले, रफिक शेख, सतीश पालवे आदी उपस्थित होते. अजित पवार यांनी गडकरी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. लंके यांच्याबरोबरही गडकरी यांनी मागण्याबाबत चर्चा केली. गडकरी यांच्या आश्वासनानंतर व प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर लंके यांनी उपोषण सोडले. उपोषणात सहभागी झालेले हरिहर गर्जे, हरिदास जाधव, किसन आव्हाड यांनीही उपोषण सोडले.
पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लंके यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मी देखील लंके यांच्याशी तीन दिवसापासून संपर्कात होतो. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात लंके यांना भेटून गेले. आजी-माजी आमदार देखील भेटून गेले. या प्रश्नी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
माझ्यासाठी तुम्ही लंके यांच्याशी बोला पवार यांनी भ्रमणध्वनीवरून मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केली. या महामार्गावर ४५० लोकांचे मृत्यू झाले आहेत. मी उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करतोय, आपण माझ्यासाठी लंके यांच्याशी बोलावे, अशी विनंती पवार यांनी गडकरी यांना केली. गडकरी यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर लंके यांच्याशी संवाद साधला.
उपोषण सुटताच लंके समर्थकांचा जल्लोष प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर लंके यांनी आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहन पवार यांनी केले. त्यानंतर लंके यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर समर्थकांनी लंके यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला. दरम्यान ३ वाजेच्या सुमारास लंके कार्यकर्त्यांसह रवाना झाले.
विखे यांच्याबद्दल बोलणे टाळले बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी पालकमंत्र्यांचा जिल्ह्यात दहशतवाद सुरू असल्याचा थेट आरोप केला होता. त्यामुळे यावर पवार बोलणे अपेक्षित होते. मात्र भाषणात किंवा पत्रकारांशी बोलताना देखील त्यांनी विखे यांच्याबद्दल बोलणे टाळत ते आपल्यासाठी महत्त्वाचे नसल्याचे दाखवून दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.