आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी आभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांबाबत होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ शुक्रवारी आंदोलनाच्या दहाव्या दिवशी मुंढण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी, हे कारण पुढे करून कृषी अभियांत्रिकी शाखेतील अभ्यासक्रम बदलणाऱ्या या लोकसेवा आयोगाकडून विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करून राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर दहा दिवसांपासून शेकडो विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे.
लोकसेवा आयोगाच्या धोरणाबाबत या विद्यार्थ्यांनी म्हटले की, मध्यप्रदेश राज्यात कृषी अभियांत्रिकीचे 163 जागासाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन झाले असताना महाराष्ट्रात कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचालनालय तयार करण्यास अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. राजस्थानमध्ये कनिष्ठ अभियंता, ओडीसा राज्यात सहाय्यक कृषी अभियंता, पाॅडेचरी राज्यात स्वतंत्र पदभरती, तामिळनाडूत सहाय्यक कृषी अभियंता, तेलंगना राज्यात सहायक कृषी अभियंत्यासाठी स्वतंत्र जागांचा निर्णय झाला.
मात्र महाराष्ट्र राज्य याबाबत अपवादात्मक ठरल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटले. दहा दिवसाच्या आंदोलनादरम्यान राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, पारनेरचे आमदार नीलेश लंके, कृषी आयुक्त चव्हाण, कुलगुरू डाॅ. प्रशांतकुमार पाटील यांनी उपोषणार्थी विद्यार्थ्यांची भेट घेऊन या मागणीबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला जात असल्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन हजारे यांनी दिले. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांतकुमार पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कृषी क्षेत्रात आभियंत्याचे योगदान महत्त्वाचे असून लोकसेवा आयोगाच्या चुकाबाबत माहिती दिली असता याप्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. दहा दिवसाच्या आंदोलना दरम्यान बहुतांशी विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असल्याने या मागण्याबाबत निवाडा होण्याची गरज आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या दहाव्या दिवशी पंधरा विद्यार्थ्यांनी मुंढण करून मागण्याचे फलक झळकावत लोकसेवा आयोगाकडून होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.