आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घोळात घोळ:मृतांच्या आकडेवारीचे गूढ अजूनही कायम!; प्रशासनाकडून आलेल्या तिन्ही संख्या वेगळ्या; मृत्युच्या आकड्यांतील तफावतीबाबत प्रशासनाचे मौन

​​​​​​​नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामाजिक संघटनांमधून व्यक्त होतोय संताप; अमरधाममधील परिस्थिती काळजात धडकी भरवणारी

नगरमध्ये रविवारी कोरोनामुळे बळी जाणारांची संख्या तब्बल १०२ वर गेली. पण मृतांचा खरा आकडा ३९ असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. त्यामुळे ‘संशयकल्लोळ’ निर्माण झाला. एक आठवड्यापासून बाधित रुग्णांची संख्या ३ हजारांहून अधिक तर मृत्यूची दैनंदिन सरासरी आकडेवारी ४० पर्यंत आहे. पण रविवारी मृतांच्या आकड्याने अचानक शंभरी ओलांडली. सोमवारी दिवसभरात देखील याबाबत कोणताच सविस्तर खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी केला नाही. त्यामुळे या ‘घोळा’मागचे ‘गूढ’ अजुनही कायम आहे. त्यामुळे शहरात नागरिकांमधून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नगर शहरात दररोज पाचशेहून अधिक, तर जिल्ह्यात एकूण ३ हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच काही दिवसांपासून नालेगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी मृतदेहांची रांग लागत आहे. ही परिस्थिती नगरकरांच्या काळजात धडकी भरवणारी आहे. प्रशासनाच्या आकडेवारीत मात्र याबाबत वारंवार ‘घोळ’ असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार ८ ते १० एप्रिल या कालावधीत कोरोनामुळे १२ जणांचे बळी गेल्याची नोंद आहे. पण दिव्य मराठीने अमरमधामात जाऊन केलेल्या चौकशीत या तीन दिवसांत १०० हून अधिक जणांना अग्निडाग देण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मृतांच्या आकडेवातील तफावत बाबत चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला वारंवार संपर्क केला. मेसेजही पाठवले, परंंतु, काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

याबाबत माध्यमांत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी प्रशासनाने कोणताच खुलासा दिला नाही. रविवारी,(१८ एप्रिल) मृतांच्या आकड्याने मात्र सगळेच हादरले. कारण एकाच दिवशी तब्बल १०२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानेच माध्यमांना दिली होती. यावेळीही जिल्हाधिकारी यांनी ‘दिव्य मराठी’ने विचारणा करण्यासाठी केलेल्या दूरध्वनींना प्रत्युत्तर दिले नाही. काही वेळाने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ‘कोराेना पोर्टलवर अपडेट करण्यात उशीर झाला. त्यामुळे एकाच दिवशी इतक्या संख्येने मृ़त्यू दिसत आहेत’, असे त्यांनी सांगितले.

आकडा बरोबरच
प्रशासनाने दिलेला मृत्युचे आकडे बरोबरच आहे. खासगी व जिल्हा रूग्णालयात कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नोंदी अॅपवर केले पाहिजे. पण दोन ते चार दिवस ते अपडेट केले जात नाही. त्यामुळे प्रशासकीय मृत्युचा आकडा व झालेले अंत्यविधी यात तफावत दिसते. आता सूचना दिल्यानंतर तातडीने अपडेट करण्यात येत आहेत.'' शंकर गोरे, आयुक्त, महानगर पालिका, अहमदनगर.

जबाबदार कोण?
दररोज येणारी बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूची आकडेवारी काळजात धडकी भरवणारी आहे. त्याहून संतापजनक बाब म्हणजेे याबाबत प्रशासन गंभीर नसणे. मृतांच्या आकडेवारीत वारंवार तफावत समोर येणे याचा अर्थ काय? जिल्हाधिकारी फक्त ३० सेकंदाच्या व्हिडिओत सांगतात की पोर्टल अपडेट नसल्याने फरक झाला. पण याला जबाबदार कोण?‌ यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे.'' सुमित वर्मा, जिल्हाध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना, अहमदनगर.

नेमका घोळ काय?
एप्रिलमध्ये पोर्टलवर आकडेवारी अपलोड होत नव्हती. रविवारी अपडेट केल्यानंतर अचानक आकडेवारी १०२ वर गेल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे म्हणणे आहे. तरीही जनतेच्या मनात तफावतीमागील गूढ कायम आहे. जिल्हा रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी १०२, राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत ८८ आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार ३९ मृत्यू झाले.

सर्वांची दिशाभूल
रविवारी जिल्ह्यातील बाधितांची आणि मृत्यूची आकडेवारी माध्यमांत पाहिली. याबाबत चक्क जिल्हाधिकाऱ्यांसारखे जबाबदार अधिकारी पोर्टल अपलोड करायला उशिर झाला म्हणून आकडेवारीत तफावत असल्याचे सांगतात, ही शंकास्पद बाब आहे. राज्य शासनालाही चुकीचीच माहिती सादर केलेली आहे. असे असेल तर जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा ? अॅड. शाम असावा, सामाजिक कार्यकर्ते.

बातम्या आणखी आहेत...