आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडिलांचे छत्र हरपले, आईसह कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर, परिस्थिती हालाखीची पण शिक्षण घेऊन मोठं व्हायचं...आईचे पांग फेडायचे. हे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत असलेल्या साेहेल या तरुणावर काळाने अचानक घाला घातला. एकीकडे व्हॅलेंटाईनच्या दिवशी आई बापांच्या कमाईवर हातात गुलाबाचे फुल घेऊन पोरींच्या मागे धावणारी तरुणाई होती. तर दुसरीकडे साेहेल हा शिक्षण व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हाती फावडे घेउन ट्रकवर शेणखत भरण्याचे काम करीत होता. खताची गाडी खाली करण्यासाठी वैजापूर येथे गेलेला सोहेल गाडी खाली झाल्यावर हातपाय धुण्यासाठी समृध्दी महामार्गलगतच्या एक्स्प्रेस कॅनॉलमध्ये उतरला. पण वर चढता चढता पाय घसरून पडला आणि त्याचे सर्व स्वप्न पाण्यात विलीन झाले.
सोहेल मीरा पठाण (१९) हा विद्यार्थी तालुक्यातील कान्हेगाव येथील रहिवासी असून बेलापूर शिक्षण संस्थेच्या जेटीएस कनिष्ठ महाविद्यालयात १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षण घेता घेता मोलमजुरी करून सोहेल कुटुंबाची गुजराण करीत हाेता. कुटुंब व शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी कॉलेज करून श्रीरामपूर येथे कामास येत होता. ट्रक मध्ये शेणखत भरून वैजापूर येथील संचेती फार्म वर टाकण्याचे काम तो करीत होता. मंगळवारी हात-पाय धूवून बाहेर पडत असताना पाय घसरून पाण्यात पडला. त्याच्या सोबत असलेल्या हनुमंता बर्डे यांनी प्रवाहात उडी घेत सोहेलला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच कान्हेगावचे सरपंच गीताराम खरात, सुनील गिरी आदींसह अनेकांनी वैजापूर येथे जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद महानगरपालिकेचे अग्निशमनदलाचे जवानांनीही बुधवारी सकाळपासून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळी ६ पर्यत मृतदेह सापडला नव्हता. रात्री उशिराने वैजापूर पोलीस ठाण्यात हनुमंता बर्डे यांचे खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास हेड काॅन्स्टेबल किसन गवळी हे करत आहे. सोहेल यास वडील नाही, आई व दोन बहीणी आहेत. पढेगांव येथील यशवंत विद्यालयात इयत्ता दहावीत प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाला होता. त्या्च्यावर काळाने घाला घातल्याने कान्हेगांव पढेगांव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.