आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरत-चेन्नई या राष्ट्रीय महामार्गाचे नगर जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणजे शहापूर (चांदबिबी महल).. या शहापूरपासूनच अहमदनगर-अक्कलकोट हा नवीन सहा पदरी ‘ग्रीन फील्ड’ एक्सप्रेस-वे तयार होत आहे. हा नवा ‘ग्रीन फील्ड’ नगर जिल्ह्यातील १८ गावांमधून जाणार असून, त्यासाठी ५५९ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. आतापर्यंत ११ गावांची मोजणी पूर्ण झाली असून, मार्चअखेरपर्यंत मोजणी व भूसंपादन पूर्ण केले जाईल.
त्यानंतर ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. नगर शहराजवळील चांदबिबी महालाजवळून अहमदनगर-बीड-सोलापूर- अक्कलकोट हा नवा ‘ग्रीन फील्ड’ एक्सप्रेस-वे जात आहे. सुरत - चेन्नई या राष्ट्रीय महामार्गाचा हा एक टप्पा असून, एकूण ४ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. नगर व बीड जिल्ह्यातील ३७ गावांतून हा ‘ग्रीन फील्ड’ जाईल. नगर जिल्ह्यातील नगर, जामखेड या दोन तालुक्यांतील १८ गावांचा त्यात समावेश असणार आहे.
आतापर्यंत १८ पैकी ११ गावांतील जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. नगर तालुक्यातील शहापूर (चांदबिबी महल) येथे सुरू असलेल्या १० किलोमीटर अंतराच्या ‘ग्रीन फील्ड’मार्गे चिंचोडी पाटील येथून आष्टी व जामखेडला हा महामार्ग जोडला जाणार आहे. हैदराबादचा दुसरा टप्पा हा ‘ग्रीन फील्ड’ असेल. विशेष म्हणजे नगरमधून तयार होऊन जाणारा हा पहिलाच ‘ग्रीन फील्ड’ एक्सप्रेस-वे असणार आहे. ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष या ‘ग्रीन फील्ड’चे काम सुरू होणार आहे.
अक्कलकोटचा प्रवास सुखकर होणार
नगर शहराजवळून जाणारा अहमदनगर - बीड - सोलापूर - अक्कलकोट हा ‘ग्रीन फील्ड’ शहापूरपासूनच सुरत- चेन्नईला जोडण्यात येणार आहे. नवा नगर अक्कलकोट मार्ग पूर्ण झाल्यानंतर नगरहून जाणाऱ्या प्रवाशांना अवघ्या ३ तासांत अक्कलकोटला जाता येणार आहे.
मार्चपर्यंत ग्रीन फील्डची मोजणी पूर्ण होणार
ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे हा सहा पदरी आहे. मार्च अखेरपर्यंत ही मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जुलै महिन्यापासून प्रत्यक्षात भूसंपादन केले जाणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष रस्त्याचा कामाला सुरुवात होणार आहे. मिलिंद वाबळे, उपमहाप्रबंधक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
आष्टीतील दोन गावांचे भूसंपादन
अहमदनगर - बीड - सोलापूर - अक्कलकोट हा ‘ग्रीन फील्ड’ बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील १९ गावांमधून जाणार आहे. आष्टी तालुक्यातील गावांची भूसंपादन व मोजणीची प्रक्रिया ही नगरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाकडे आहे. १९ पैकी आतापर्यंत आष्टी तालुक्यातील २ गावांचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.
नगर-मनमाडची निविदा आज उघडणार
उत्तर व दक्षिण भारतातील भाविकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या नगर - मनमाड महामार्गाच्या कामाची निविदा गुरुवारी (२ फेब्रुवारी) प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर एप्रिल, मे महिन्यात प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विळद ते सावळीविहीर असे ७५ किलोमीटरचे हे काम असून, ७९७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा रस्ता रखडला आहे. त्याची फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.
असा जाणार ‘ग्रीन फील्ड’
नगर तालुक्यातील शहापूर येथून हा ‘ग्रीन फील्ड’ सुरू होईल. सुरत - चेन्नईचा हा दुसरा टप्पा असून, चिंचोडी पाटीलमार्गे आष्टी, भूम परांडा, सोलापूर, अक्कलकोट मार्गे आंध्र प्रदेशातील कर्नुल येथे हा ‘ग्रीन फील्ड’ जाणार आहे. कर्नुल येथून हा चेन्नईला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.