आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने निष्ठावंत कार्यकर्ता गमावला:अहमदनगर शहराचे उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकरांचे निधन; गेल्या काही दिवसांपासून होते आजारी

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहर भाजपचे उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकर यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निंबाळकर गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील साईदीप या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

भाजपच्या शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी निंबाळकर यांच्यावर अडीच वर्षांपूर्वी शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी सोपवली होती. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून निंबाळकर यांची ओळख होती. केडगाव भागात भाजपचे संघटन वाढवण्यात निंबाळकर यांचा मोठा वाटा होता. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वयंसेवक तथा भाजपाची स्थापना झाल्यापासुन ते पक्षाचे कार्यकर्ते होते. शिवाय उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून त्यांचे नाव होते.

हाडाचा कार्यकर्ता गमावला

दरम्यान जगन्नाथ निंबाळकर यांच्या निधनाने भाजपने एक हाडाचा कार्यकर्ता गमावला आहे. निंबाळकर यांनी केडगावमध्ये पक्ष वाढीसाठी दिलेले योगदान मोठे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी दिली.

दुपारी अंत्यसंस्कार

भारतीय जनता पक्षाच्या विविध प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनात निंबाळकर यांचा सहभाग असायचा. पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. आज दुपारी साडेअकरा ते बारा या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अहमदनगर शहरातील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान भैया गंधे म्हणाले, निंबाळकर यांच्या रुपाने पक्षाचा आधारवड हरपला आहे. जगन्नाथ तात्या निंबाळकर हे शहर भाजपाचे विद्यमान उपाध्यक्ष होते. पक्षाच्या स्थापनेपासुनच कट्टर कार्यकर्ता असलेल्या तात्यांचे पक्षाच्या विविध निर्णयांमधील मार्गदर्शनाची उणीव कायमच भासत राहिल. असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...