आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचर्चवरील हल्ले थांबण्यात यावे व ख्रिस्ती धर्मगुरुंवारील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी नेवासे तालुका सकल ख्रिस्ती बांधवांच्या वतीने 2 फेब्रुवारी गुरुवारी दुपारी नेवासे तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये ख्रिस्त समाजातील सर्व पंथातील जनसमुदाय सहभागी होता. ख्रिस्त राजा चर्च घोडेगावचे प्रमुख धर्मगुरु फादर सतीश कदम व नेवासे येथील कॅथोलिक आश्रम ज्ञानमाऊली चर्चचे धर्मगुरु जॉन गुलदेवकर, नेवासे तालुका पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष प्रकाश चक्रणारायण, उपाध्यक्ष पास्टर किशोर बोर्गे व तालुक्यातील सेवक व पाळक यांनी हा मूक मोर्चा काढला.
नेवासे पंचयात समितीतून निघालेला मोर्चात काळ्याफिती लावून मोर्चेकरी सहभागी झाले होते. तहसील कार्यालय येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध
यावेळी ख्रिस्त राजा चर्चचे धर्मगुरु सतीश कदम म्हणाले, भारतीय ख्रिश्चन असल्याचा अभिमान आहे. चर्च व धर्मगुरूंवरील हल्ले त्वरित थांबवा, हल्लेखोरांचा त्वरित बंदोबस्त करा, धर्माच्या शिकवणीनुसार भक्तीचा आमचा हक्क आहे, असे सांगून ख्रिस्ती धर्मियांवरील होणाऱ्या भ्याड हल्ल्याचा फादर कदम यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करा. अशा मागण्या करण्यात आल्या.
संभ्रम पसरवला जातोय
ख्रिस्ती धर्माच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या वधस्तंभाचा अवमान केला जात आहे. धर्मस्थळे पाडण्याची वक्तव्ये सुरू आहेत. ख्रिस्ती विधी, प्रभू भोजन विधीसंदर्भात संभ्रम निर्माण केला जात असल्याचे निषेध ख्रिस्ती बांधवांनी सभेत केला. यावेळी मोर्चात जनाभाऊ मिरपगार, किशोर लोंढे, राजेंद्र वाघमारे, पप्पू इंगळे, रवींद्र पवार, मनोज ससाणे, शेखर वाघमारे, मुन्ना चक्रणारायण, रंजन जाधव, मार्कस बोर्डे, राजू साळवे, विश्वास चक्रणारायण, बालूभाऊ आल्हाट, रेव्हरेंड अनिल वंजारे यांच्यासह मोठ्या संख्येने सेवक व धर्मगुरु सहभागी होते.
नेवासे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासन स्तरावर पाठवल्या जातील, असे आश्वासन मोर्चाकऱ्यांना दिले. त्यानंतर राष्ट्रगिताने आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.