आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीत युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाने अन्याय केल्याचा दावा करीत व त्याचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
प्रचार करण्याची भूमिका
तीन-चार दिवसांपूर्वी साळुंके यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा प्रचार करणार असल्याची भूमिका मांडली होती व त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार साळुंकेंना दोन दिवसात खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.
नोटीसला उत्तर देण्याऐवजी राजीनामा
या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या नोटीशीचा खुलासा करण्यापेक्षा जिल्हाध्यक्षपदच सोडण्याचा निर्णय साळुंकेंनी घेतला असून, तसे पत्र मंगळवारीच (24 जानेवारी) प्रदेशाध्यक्ष पटोले यांना पाठवले आहे. दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीच्यानिमित्ताने जिल्हा व नगर शहर काँग्रेसमध्ये परस्परविरोधी भूमिका स्पष्ट झाल्या असून, जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये यामुळे फूट पडल्याचेही स्पष्ट झाले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर करून कोरा एबी फॉर्म दिला असताना त्यांनी उमेदवारी दाखल केली नाही व त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पक्षाकडे सत्यजितच्या उमेदवारीची मागणी केली होती, पण पक्षाने ती दिली नसल्याने त्याने अपक्ष उमेदवारी भरल्याचे स्पष्टीकरण डॉ. तांबेंनी दिले आहे तर खुद्द सत्यजित तांबेंनीही पक्षाकडून अन्याय झाल्याची भावना अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांचे पक्षातून निलंबन केले आहे.
तांबेंच्या समर्थनार्थ उघड भूमिका
या पार्श्वभूमीवर, जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी सत्यजित तांबे यांच्या बाजूने उघड भूमिका घेतली होती व त्यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रदेश काँग्रेसने साळुंके यांना नोटीस पाठवून तांबेंचा प्रचार करणार असल्याची भूमिका तुमची स्वतःची आहे की, तुमच्यावतीने अन्य कोणी ही बातमी दिली, याचा खुलासा दोन दिवसात करण्याचे आदेश त्यांना दिले होते. मात्र, साळुंके यांनी या नोटिशीवर खुलासा करण्याऐवजी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचाच राजीनामा दिला आहे.
राजीनाम्याचे पत्र
मागील तीन वर्षांपासून मी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे काम करीत असून, नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाने अन्याय केला असल्याने त्याचा निषेध म्हणून मी माझा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे व हा राजीनामा मंजूर करण्यात यावा, ही विनंती, असे साळुंके यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.