आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर कलेक्टर ऑफीससमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन:विविध प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत काम बंदचा इशारा

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रलंबित मागण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी बुधवार (1 फेब्रुवारी) पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्यासाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत बुधवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले.

प्रलंबित मागण्यांसाठी 18 जानेवारीला कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय संप केला होता.तसेच 25 जानेवारीपासून असहकार आंदोलन सुरु केले आहे. आता पुढच्या टप्प्यात बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कामगार संघटनेने घेतला होता. त्यानुसार हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

रोहयो अंतर्गत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेटर संघटनेने बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. संघटनेचे पदाधिकारी प्रशांत साबळे,दीपक मेटे ,गणेश गुंड,समीर शेख,अविनाश परळकर,निलेश तनपुरे,सतीश दिघे,राहुल भोसले,अक्षय नवले,राजश्री पाटील,इंद्रायणी भारुडे ,किरण करपे,किशोर साळवे,संतोष शिंदे ,नितीन हजारे,बाळासाहेब शिंगाडे,प्रियंका चौधरी,अक्षय दुधाळ,अतुल बनसोड,विशाल पांढरे आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे, पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे, योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर 2019 मधील मानधन वाढीतील प्रलंबित फरकाची रक्कम तात्काळ अदा करावी, मध्य प्रदेश शासनाप्रमाणे वयाच्या 62 व्या वर्षापर्यंत नोकरीची हमी मिळावी, बाह्यस्थ पध्दतीने कंत्राटी मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थेकडून विहित वेळेत व मुदतीत मानधन अदा केले जात नाही, मागील दोन वर्षातील दैनंदिन भत्ता व प्रवास भत्ता अदा करण्यात यावा. अशा मागण्या यावेळी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...