आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिन्यात 6 हजार 344 जात वैधता प्रमाणपत्र निकाली:नगर जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात राज्यात अव्वल

अहमदनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात नगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून, गेल्या दीड महिन्यात अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीने 6 हजार 344 जात वैधता प्रमाणपत्र निकाली काढून अव्वल स्थान मिळवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा असून, नागपूर जिल्हा जात पडताळणी समितीने 4 हजार 956 प्रकरणे निकाली काढली आहेत.

राज्यात 17 सप्टेंबर पासून जात वैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गंत राज्यात 85 हजार 884 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने सर्वाधिक 6 हजार 344 प्रकरणे निकाली काढत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. 17 सप्टेंबर सेवा पंधरवडा कालावधी सुरू झाल्यापासून ते 9 नोव्हेंबर पर्यंत राज्यात देण्यात आलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्रांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

यात पहिल्या क्रमांकावर अहमदनगर जिल्हा आहे.त्याखालोखाल नागपूर समितीने 4 हजार 956 प्रकरणे निकाली काढली आहेत. नाशिक विभागातील नाशिक समितीने 4 हजार 280 प्रकरणे निकाली काढत पाचवे स्थान पटकाविले आहे. जळगाव समितीने 3 हजार 490 प्रकरणे निकाली काढत आठवे स्थान गाठले आहे.

नगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सेवा पंधरवड्यानिमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून 1 हजार 734 जातवैधता पडताळणी प्रमाणपत्रांचे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन वाटप केले. जिल्ह्यातील 111 महाविद्यालयांमधील प्राचार्य व कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. जातप्रमाणपत्र वाटप करतांना त्रुटी राहू नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची ऑनलाईन वेबनार द्वारे कार्यशाळा घेण्यात आल्या.

जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज कसे भरावेत? त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे ? शाळा, महाविद्यालय यांनी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे? विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव कशा प्रकारे सादर करावेत? ऑनलाइन अर्जांचा भरणा कसा करावा? या विषयावर सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.राहाता, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा, पारनेर व कोपरगाव या याठिकाणी 2 ते 3 तालुक्यांच्या समावेशासह कार्यशाळा घेण्यात आल्या. अशी माहिती बुधवारी (9 नोव्हेंबर) लाख अहमदनगर समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी विकास मारूती पानसरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...