आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी:अहमदनगरला अवकाळी पावसाचा फटका; अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, पीके झोपली

अहमदनगर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश,शहरी भागात रस्त्यांवर साचले पाणी,शेतकरी मात्र हवालदिल - Divya Marathi
जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश,शहरी भागात रस्त्यांवर साचले पाणी,शेतकरी मात्र हवालदिल

अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारी (18 मार्च) ला अवकाळी व गारपिटीचा पाऊस झाला असून, त्याचा मोठा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. शनिवारी शहरात दुपारी 1 वाजता व सायंकाळी 4 वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. दरम्यान अवकाळी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वतः नैसर्गिक परिस्थितीत पंचनामे करण्याची तयारी दर्शवली आहे अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शनिवारी (18 मार्च) ला दिली.

अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शनिवारी गारपिटीचा अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेला गहू भिजला आहे. त्याचबरोबर हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे देखील या गारपिटीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव या तालुक्यांमध्ये फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. गारपिटीच्या व वादळी वाऱ्याच्या पावसामुळे फळबागातील संत्री, मोसंबी तसेच आंब्याचा मोहोर गळून पडला आहे.

एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना दुसरीकडे मात्र नुकसानीच्या पिकाचे पंचनामे होत नाहीत. महसूल कर्मचारी संपावर असल्यामुळे हे पंचनामे लांबणीवर पडले आहेत.त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

विशेष म्हणजे अहमदनगर शहरातील बहुतेक रस्त्यावर जून, जुलैतील पावसामुळे खड्डे कायम असताना या अवकाळी पावसामुळे आणखी त्यात भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान "आयएमडी' ने पुढच्या तीन ते चार तासात अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश

अवकाळी पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यात पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत सर्वे करून पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महसूल कर्मचारी संपावर असले तरी त्यांनी नैसर्गिक आपत्तीत स्वतःहून पंचनामे करण्याची तयारी दर्शवली आहे. संपाच्या कालावधीत आरोग्य सेवा, पाणी व्यवस्था सुरळीत आहे त्याचा मोठा विषय नाही. असे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शनिवारी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...