आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा अखेर मृत्यू झाला आहे. सागर बुधा बरेला असे मृत्यू झालेल्या 5 वर्षीय मुलाचे नाव आहे.
NDRFच्या 5 पथकांचे प्रयत्न
उसतोड कामगाराचा हा मुलगा सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास खेळत असताना शेतातील बोअरवेलमध्ये पडला होता. 11 फूट खाली अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पाच पथकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मुलाला रात्री उशिरा अडीच वाजेच्या दरम्यान बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश देखील आले. परंतु तोपर्यंत मुलाची प्राणज्योत मालवली होती. तब्बल साडे आठ तास हा चिमुकला बोअरवेलमध्ये अडकला होता.
बोअरवेलला समांतर खड्डा खोदला
कोपर्डी येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यातील चिडीयापुरा येथून हे कुटुंब ऊसतोडीसाठी आले आहेत. मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याचे कळताच त्याला बाहेर काढण्यासाठी बोअरवेलच्या समांतर दोन जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू करण्यात आले होते.
अग्निशमन, आरोग्य यंत्रणा तैनात
घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश गावित यांच्यासह पोलिस कर्मचारी श्याम जाधव, गोवर्धन कदम, राहुल खरात आणि जितेंद्र सरोदे यांनी कोपर्डी गाठत युद्धपातळीवर ग्रामस्थांच्या साहाय्याने मदतकार्य हाती घेतले. घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायत अग्निशामक दल यांच्यासह महसूल प्रशासन आणि गटविकास अधिकारी तळ ठोकून होते. जेसीबीच्या साहाय्याने बोअरजवळ खोदून मुलाला बाहेर काढण्यात आले. त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.