आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींना पाठवले पोस्टाने कांदे!:शेतकरी संघटना आक्रमक, कांदा निर्यातबंदीचा तीव्र निषेध

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेल्या कांद्याचा खर्चही निघणे अवघड झाले आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष बच्चू मोढवे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (6 मार्च) नगर येथील प्रधान डाकघर कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने कांदे पाठवून कांदा निर्यात बंदीचा निषेध नोंदवला.

सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल 200 ते 500 रुपये भाव मिळत आहे. कांद्याला एकरी सुमारे 50 हजार रुपये लागवड खर्च येतो. परंतु भाव मात्र मातीमोल मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांत असंताेष खदखदत आहे. दरम्यान, कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने कांदे पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बच्चू मोढवे, शेतकरी विकास मंडळाचे शिवराज कापरे, रमेश चिताळ, धनंजय गायके, शिवाजी निमसे, कुंडलिक चिताळ आदींसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

जागतिक बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या असताना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला कांदा मातीमोल भावाने विकण्याची वेळ आली. केंद्र सरकारने निर्यात बंदी हटवून कांद्याला जागतिक बाजारपेठेत वाढलेल्या किमतीचा फायदा शेतकऱ्यांना मिळून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वर्षभर केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपला कांदा मातीमोल भावाने विकला, त्या शेतकऱ्यांना प्रतिकिलोला दहा रुपये अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष बच्चू मोढवे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...