आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुमारे तीन कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीसाठी वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्याने पाथर्डी-शेवगावसह जायकवाडी नळ पाणीपुरवठा योजनेवरील 55 गावांचा पाणीपुरवठा बेमुदत बंद झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ नागरिकावर आली.
पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील 55 गावांची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाण्याच्या उद्भवावरून सुरू आहे.पाणीउपसा केंद्र जलशुद्धीकरण केंद्र व वितरण टाक्या अशा ठिकाणी वीज एक्सप्रेस फिडरमधून दिली जाते. सुमारे अडीच कोटी थकबाकी आहे. वारंवार मागणी करूनही संबंधित पालिकांनी थकबाकी न दिल्याने अंतिम नोटीस देऊन वीज वितरण कंपनीने तीन दिवसापूर्वी पाणी योजनेचा पुरवठा खंडित केला.सुरळीत पुरवठ्याबाबत अनेकांनी प्रयत्न करूनही थकबाकीला पर्याय नसल्याचे सांगत वितरण कंपनीने पैसे भरा, वीज देतो अशी भूमिका घेतली.
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याची गरज वाढत असताना पाणीपुरवठा बंद झाल्याने पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची नागरिकावर वेळ आली. पाणी विकणाऱ्यांच्या मागे धावून पिण्यासाठी पाणी विकत घेताना सुद्धा लोकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. शहरात सुमारे 699 बोअर पंप खासगी मार्केटचे असून पालिकेचे 85 बोअरपैकी बोटावर मोजण्या एवढे पंप चालू आहेत. बहुतेक पंपाचे पाणी पिण्यायोग्य नाही. शहराच्या पाणीपुरवठ्याकडे सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष नाही. निवडणुका लांबल्याने चमकोगिरी करणारे कार्यकर्ते सध्या शांत आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी अडचणीतून मार्ग काढणारा कोण असा प्रश्न पुढे आला. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले पाथर्डी-शेवगाव पालिकांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी वितरण कंपनीने गेल्या तीन दिवसापासून वीजपुरवठा खंडित केला.
याबाबत आमदार मोनिका राजळे यांनीही चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तातडीने मार्ग निघू शकला नाही. येत्या सोमवारी थकबाकी पोटी किमान 25 लाखांचा धनादेश दिल्यानंतर विद्युत पुरवठा जोडला गेल्यास मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरू होऊ शकेल. नागरिकांनी सहकार्य करावे. शहराला तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या प्रश्नावर मात्र काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. शासनाकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून दोन हप्ते प्रलंबित असून त्यामुळे वीजबिल थकल्याचे पालिका प्रशासनाकडून अधिक माहिती घेता समजले. शहरात मात्र सर्व विभागात मिळेल तिथून पाणी मिळवण्यासाठी नागरिक विशेषत: महिलांची गर्दी वाढली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.