आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी घर देता का घर?:मदारी समाजाचे अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोंबारीचा खेळ करुन आंदोलन

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गावोगावी डोंबारीचा खेळ दाखवणाऱ्या डोंबारी समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मंगळवार (3 जानेवारी) ला अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मदारी वसाहतीचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी अभिनव आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पाल टाकून मदारी समाजाने डोंबारीचा खेळ सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे वन्यजीव कायदे अंतर्गत सर्प पाळण्यावर बंदी असल्याने प्लॅस्टिकचा साप टोपलीत ठेवून अभिनव पद्धतीने खेळ सादर केला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा भटके विमुक्त आदिवासी विकास आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे अभिनव आंदोलन केले.या आंदोलनात लोकधिकरचे प्रवक्ते बापू ओहोळ, विशाल पवार, आतिश पारवे, आजिनाथ शिंदे, हुसेन मदारी, सलीम मदारी, सरदार मदारी, फकीरा मदारी,गणपत कराळे,सचिन भिंगार दिवे मुस्तफा मदारी, मोहम्मद मदारी, रेश्मा मदारी, शहाजान मदारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मदारी समाजाच्या कुटुंबासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत 1 फेब्रुवारी 2016 ला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घरांची वसाहत करण्याचा निर्णय झाला होता. मात्र 6 वर्ष उलटूनही या वसाहतीचे बांधकाम सुरू झाले नाही. याबाबत मदारी समाजाने तहसीलदार गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आतापर्यंत 6 आंदोलने केली. भूमीहीन असलेल्या मदारी समाजाला अनेक वर्षापासून राहण्यासाठी घरे नाहीत. मदारी समाजाला घरे तातडीने बांधून द्यावी, अशी मागणी यावेळी डोंबारीचा खेळ सादर करता करता आंदोलनकर्त्यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोंबारी चा खेळ सादर करून सुरू असलेल्या आंदोलन पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. डोंबारी समाज आजही एक वेळच्या जेवणासाठी गावोगावी भटकंती करत आहे. हे दुर्दैवी आहे त्यामुळे या समाजाला आज घर देता का घर असं म्हणायसाठी अशा प्रकारचे आंदोलन करावे लागत आहे. असे,वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा भटके विमुक्त आदिवासी विकास आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले.

वन्यजीव कायद्यांतर्गत सर्प बाळगण्यास बंदी,

प्लास्टिकचा साप दाखवून जादूचे प्रयोग

वन्यजीव कायदे अंतर्गत सर्प किंवा अन्य प्राणी बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचा परिणाम गावोगावी डोंबारीचा खेळ सादर करून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या मदारी समाजावर देखील झाला आहे. त्यामुळे बहुतांशी मदारी समाजाच्या लोकांना जादूची प्रयोग दाखवताना प्लास्टिकचा साप दाखवा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...