आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरचा उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला:पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचतोय

बंडू पवार । अहमदनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरातील तीन किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल रविवारी (20 नोव्हेंबर) सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रविवारी पहिल्याच दिवशी या उड्डाणपुलावरून जाण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी दिसून आली.

प्रवाशांची वेळेची बचत

शनिवारी या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. उड्डाणपूल खुला झाल्यामुळे औरंगाबादहून पुण्याकडे व पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचत आहे.

331 कोटींचा खर्च

अहमदनगर शहरातील औरंगाबाद-पुणे रस्त्यावर उभारण्यात आलेल्या तीन किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर शनिवारी रात्री नेत्रदीपक आतिषबाजी व रोषणाई करण्यात आली होती. रविवारपासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता. त्याप्रमाणे रविवारी सकाळीच हा उड्डाणपूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तब्बल 331 कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल उभारण्यात आला असून 22 महिन्यांत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाची रुंदी 19 मीटर असून, चार पदरी हा उड्डाणपूल आहे.

प्रवाशांची गर्दी

शनिवारी सायंकाळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बहुचर्चित उड्डाणपुलाचे डिजिटल उद्घाटन केले होते. रविवारी सकाळी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुल्या झाल्यानंतर नगरकरांनी देखील उड्डाणपुलावरून टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

रविवारी सकाळपासून या उड्डाणपुलावरून जाण्यासाठी वाहनांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रथमच वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल खुला झाल्यामुळे रविवारच्या सुट्टीचा आनंद उड्डाणपुलाला भेट देण्यासाठी नगरकरांनी घेतला. दरम्यान मार्च 2019 मध्ये या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा पाया रोवला गेला होता. तत्कालीन स्वर्गीय खासदार दिलीप गांधी व सध्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केला.

वाहतूक कोंडीतून सुटका

उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे औरंगाबादहून पुण्याकडे व पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचत आहे. उड्डाणपूल होण्यापूर्वी स्टेट बँक चौक, कोठला, माळीवाडा बस स्थानक, स्वस्तिक चौक या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. आता मात्र वाहनचालकांना थेट जाता येत आहे.

बातम्या आणखी आहेत...