आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवार पहाटेपासून (23 जानेवारी) पश्चिम महाराष्ट्रातील सर्वदूर भागातून विशेषकरून नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात तापमानात प्रकर्षांने घट होईल व 5 सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. हवामान विभागामार्फतही हेच अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. या काळात शेतातील उभ्या पिकांना कोल्ड बर्निंग होण्याची शक्यता असते.
अतिथंडीमुळे पिके जळण्याचा धोका अधिक असतो. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांसह वेलवर्गीय पिकांबाबत वेळीच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन अकोल्यातील वीरगाव येथील अद्ययावत विश्व हायटेक नर्सरीचे संचालक विरेंद्र थोरात यांनी केले आहे.
विश्व हायटेक नर्सरीचे संचालक विरेंद्र थोरात यांचे आवाहन
दैनिक दिव्य मराठीशी बोलताना विरेंद्र थोरात म्हणाले, सध्या हिवाळा सुरू असून, सर्वत्र थंडीची लाट पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत वातावरणातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याने शेतकऱ्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. 23 ते 29 जानेवारीपर्यंत रात्री 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कालावधीत 5 ते 6 सेल्सिअसपर्यंत तापमान खालावण्याची शक्यता हवामान विभागानेही वर्तविली आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांसह वेलवर्गीय पिकांबाबत शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके चांगली जोमात आली आहे. परंतू वातावरणात सतत बदल होत असल्याने त्याचा पिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. याचा परिणाम कधी कडाक्याची थंडी तर कधी धुकेच धुके पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक बचावासाठी वेळीच पावले उचलण्याची गरज असल्याचे मत थोरात यांनी व्यक्त केले.
या दिवसांत थंडीमुळे पिके (कोल्ड बर्निंग) जळण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे हितावह ठरते. यामध्ये पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास शेतामध्ये शेकोट्या करणे, धूर करणे, शेत ओले करणे, पिकास पाणी देणे, पीक आच्छादन करणे (क्रॉप कव्हर) असे उपाय महत्त्वाची भूमिका निभावतात. या हवामानाचा धोका हिवाळी कांदा, ब्रीकोली, फ्लॉवर, कोबी, गहू यांसारख्या रब्बी हंगामातील पिकांना फारसा धोका संभवत नाही. मात्र मिरची, वांगे, काकडी, ढोबळी मिर्ची, टोमॅटो व वेलवर्गीय पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहेत. त्यामुळे 23 ते 29 जानेवारी या काळात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही विरेंद्र थोरात यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.