आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारणा महोत्सव:चिचोंडी शिराळ येथील आनंदतीर्थावर अक्षयतृतीया वर्षीतप पारणा महोत्सव; नेहा बाफना व  रश्मी दर्शनाजी  यांनी सुमधुर आवाजामध्ये तपस्वी अभिनंदन गीत सादर केले

पाथर्डी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय तृतीयेचा दिवस हा भगवान ऋषभदेवांच्या वर्षीतप पारण्याची महान परंपरा सांगणारा दिवस आहे. भगवान ऋषभदेवांच्या तेरा महिन्यांच्या कठोर तपाची सांगता श्रेयांसकुमारच्या ईक्षुरस (उसाचा रस) या आहारदानाने झाली. हीच तप व आत्मआराधना सांगणारी महान परंपरा आजही वर्षीतप करणारे तपस्वी पुढे चालवत आहेत.

श्रेयांस कुमार यांना त्यावेळी पडलेल्या तीन स्वप्नांचा अर्थ जाणून घेत आजच्या काळात ते सर्वांनी अंगिकारून कर्म करावे. तप, आत्मसाधना व उत्तम चारित्र्य याद्वारे प्रत्येकाने आपले जीवन समृद्ध करावे. वर्षीतप करणारे तपस्वी अभिनंदनास पात्र असून या तपस्वी नी या तपा बरोबर आंतरिक तप करून आत्मकल्याण साधावे, असे आवाहन जैन साध्वी प्रथमदर्शनाजी महाराज यांनी केले.

त्या चिचोंडी शिराळ येथील वर्षीतप पारणा महोत्सवात बोलत होत्या. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची जन्मभूमी चिचोंडी येथील आनंदतीर्थ याठिकाणी यावर्षी नवव्या अक्षयतृतीया वर्षीतप पारणा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी जैन साध्वी मंगलज्योतीजी, प्रथमदर्शनाजी, अरोहीदर्शनाजी, रश्मीदर्शनाजी आदी जैनसाध्वीसह गुरू आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश सुराणा, विलास कटारिया, रविभाऊ नहार, संतोष शेटिया, नितीन बाफना, संजय गुगळे आदी उपस्थित होते. सकाळी भक्तामर स्तोत्र अनुष्ठानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जैन स्थानकातून तपस्वींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आनंदतीर्थाचे प्रणेते, उपाध्याय प्रवीणऋषीजी महाराज यांनी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन करून तपस्वींना शुभेच्छा दिल्या. नेहा बाफना व रश्मी दर्शनाजी यांनी सुमधुर आवाजामध्ये तपस्वी अभिनंदन गीत सादर केले.

यावेळी सतीश सुराणा म्हणाले, २०१४ साली आनंद तिर्थावर सुरू केलेल्या या वर्षीतप पारणा महोत्सवाने आज स्थानकवासी परंपरेमध्ये मोठे स्थान मिळवले. आनंद तीर्थावरून सकल जैन समाजाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे उपक्रम प्रवीणऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने राबवले जातील. या वर्षीतप पारणा महोत्सवामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून तपस्वी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन चेन्नई येथील केवलचंदजी, जवरीलालजी बरमेचा परिवार, आनंद तीर्थ परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन अमोल पटवा यांनी केले. उपस्थितांचे आभार संतोष शेठिया यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...