आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साई मंदिर:साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची सर्वपक्षीयांची मागणी, 17 मार्चपासून बंद अाहे साईमंदिर

शिर्डी (नवनाथ दिघे)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील धार्मिक तीर्थक्षेत्रांना कुलूप लावल्याने मंदिरांचा आणि स्थानिक व्यावसायिकांचा आर्थिक कणा कोलमडून गेला आहे. जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिर १७ मार्चपासून बंद अाहे. यामुळे शिर्डीतील व्यावसायिकांचे ५०० कोटींच्या वर आर्थिक नुकसान झाले आहे. साई समाधी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी सर्वपक्षीय राजकारण्यांनी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. साई मंदिर खुले करण्यापूर्वी भाविकांची गर्दी आणि कोरोना विरोधी उपाययोजनेबाबत निश्चित भूमिका सरकार, साई संस्थान आणि व्यावसायिकांना घ्यावी लागणार आहे.

राज्यात लॉकडाऊन सुरू केल्यावर तीर्थक्षेत्रांच्या परिसरातील अर्थकारण पूर्णपणे थांबलेले आहे. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून दररोज लाखोंच्या संख्येने साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक येत असल्याने शिर्डी परिसरातील अर्थकारण गेल्या काही दिवसांत बदलून गेले. मात्र, लॉकडाऊनच्या काळात या अर्थकारणाचा पूर्णपणे ऱ्हास झाला अाहे. लहान-मोठ्या व्यावसायिकांपासून हॉटेल उद्योगही संकटात सापडला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लॉकडाऊन उठवणे हा पर्याय ठरू शकत नाही. सरकारने विशेष पॅकेज दिले तरच हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर येण्यास मदत होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांसह परिसरातील शेतकरी, शेतमजूर यांच्यावरही विपरीत परिणाम झालेला आहे. इतर राज्यातील मंदिरांप्रमाणेच शिर्डी सारख्या देवस्थानांना राज्य सरकारने लॉकडाऊनमुक्त करावे या मागणीने आता जाेर धरला आहे. मंदिर भाविकांसाठी खुले करण्यापूर्वी भाविकांच्या सुरक्षिततेची संपूर्ण हमी साई संस्थान व सरकारला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करून त्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यासाठी साई संस्थान प्रशासन व जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा लागणार आहे.

साई संस्थानलाही घ्यावी लागेल काळजी
राज्य सरकारने साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याची परवानगी दिली तर फिजिकल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करावे लागेल. त्यासाठी दिवसाकाठी फक्त तीन ते चार हजार जणांनाच दर्शन मिळण्याची सोय करताना सॅनिटायझिंगची व्यवस्था करावी लागेल. दर तीन तासांनी मंदिर सॅनिटाइझ करावे लागेल. दर्शन रांगेत भाविकांचे तापमान मोजणी यंत्रणा कार्यान्वित करावी लागेल. भक्त निवास आणि हॉटेलमध्ये भाविकांना प्रवेश देताना बारीकसारीक बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. त्याबाबत स्वतंत्र यंत्रणा तैनात करावी लागेल.