आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार:अगस्ति कारखान्यात सर्वपक्षीय‘समझोता एक्स्प्रेस’ धावावी ; मधुकर पिचड यांचे आवाहन

अकोले20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अगस्ति खऱ्या अर्थाने तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे. त्यावर अनेकांचे संसार अवलंबून आहेत. जेव्हा राजकीय संघर्ष होतात तेव्हा त्याचे दुष्परिणाम कारखान्यावर होतात. हे आपण यापुर्वीही पाहिले आहे. तेव्हा कारखान्याकडे राजकारण म्हणून न पाहता एक भाग्यलक्ष्मी म्हणूनच सर्वांनी पहावे. आपण याबाबत नेहमीच कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभांतून भूमिका जाहीर केली. आजही आपली भूमिका बिनविरोध निवडणुकीचीच आहे. म्हणूनच आताही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी. अगस्तित सर्वपक्षीय समझोता एक्स्प्रेस धावावी, असे आवाहन अगस्तिचे अध्यक्ष माजीमंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केली. पिचड यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बंद पडलेला अगस्ति कारखाना प्रतिकुल परिस्थितीत चालू करताना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आपण संचालक मंडळात प्रतिनिधीत्व देऊन नवी प्रथा पाडली. लोकशाही मार्गाने कारखाना चालवला. ‘अगस्ति’ सभासदांच्या मालकीचा आहे आणि तो सभासदांच्याच मालकीचा रहावा हीच आपली भूमिका आहे. म्हणूनच अगस्तित आपण कधीच राजकारण आणले नाही व राजकीय दृष्टीकोनातून पाहिलेही नाही. अगस्ति अडचणीत आला तेव्हा आपण त्यातून सर्वांना बरोबर घेऊन मार्ग काढला. मला अगस्ति कारखान्याची निर्मिती केल्याचा आनंद आहे. निर्मितीचा जो आनंद असतो तो कशातच नाही. अगस्तिने शेतकऱ्यांच्या उसाला नेहमीच जादा भाव देण्याचा प्रयत्न केला, किंबहूना एफआरपी पेक्षाही जास्त भाव दिला. उपपदार्थ निर्मितीसाठी इथेनॉल प्रकल्प उभारला. कारखाना टिकावा यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो. पण दोन वर्ष कारखाना बंद पडला. कामगार व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने आपण खूपच मागे गेलो, असे पिचड यांनी पत्रकात म्हटले आहे. आज राज्यात व देशात अनेक कारखाने फक्त नावालाच सहकारी आहेत, पण प्रत्यक्षात ते काहींच्या मालकीचे आहेत हे सांगायला नको. अगस्तिमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला जागेवरच बाजारपेठ निर्माण झाली. शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत, हाच कारखान्याच्या निर्मितीमागचा आपला उद्देश होता. त्यानुसारच आजपर्यंत आपण अगस्ति चालवला व यापुढेदेखील आत्मविश्वासाने तो सर्वांच्या मदतीनेच चालवू. तालुक्याची भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे याकरीता निवडणूक बिनविरोध करावी म्हणून मी सभासदांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आवाहन करीत आहे. यापूर्वी सर्वांना बरोबर घेऊनच बिनविरोध निवडणुकीची प्रथा पाडली. तीच पुढेही आपली भूमिका आहे, असेही पिचड यांनी म्हटले आहे.

माघारीपर्यंत कुणाशीही चर्चा करण्याची भूमिका आपण राजकारणाच्या पातळीवर जरुर राजकारण करू, पण कारखान्यात मात्र ते करणार नाही. बिनविरोध निवडणुकीसाठी यापूर्वी जसे आपण एकत्र आलो, बैठका घेतल्या, तसे एकत्र बसू आणि सर्वसमावेशक संचालक मंडळ देऊ. अगदी माघारीपर्यंत आपली कुणाशीही चर्चा करण्याची भूमिका राहील. अगस्ति तालुक्याची शिखर संस्था आहे. तिचे हित जोपासण्यासाठी आपली एक पाऊल मागे येण्याची तयारी आहे. कारखान्याचे सभासद व कर्मचाऱ्यांचे हित आपल्याला महत्त्वाचे वाटतेय. ते जपण्यासाठी बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रित यावे, असेही आवाहन पिचड यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...