आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका आयुक्तांचे आदेश:अहमदनगरमधील सर्व दुकाने व आस्थापनांनी मराठी भाषेत फलक लावावे

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या सूचनेनुसार नगर महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिले आहेत. त्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व दुकाने व आस्थापना यांना आपले फलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक असणार आहे.

दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत असाव्यात, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार मनपा आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून दुकाने व आस्थापनाने मराठीत फलक लावावेत, असे आदेश दिले आहेत. त्यासाठी 15 दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. मराठी भाषेत फलक नसल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, संबंधित दुकानदार वा आस्थापनेचा प्रमुख आपला नामफलक मराठी बरोबरच आणखी इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, मद्यविक्री दुकानांच्या नामफलकांवर कुठेही गड-किल्ले, महनीय व्यक्तींचे नाव लिहीता येणार नाही, असेही शासनाच्या निर्नयाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता दुकानांवर मराठी भाषेतील नाव छोट्या अक्षरात न टाकता इतर भाषेतील नावाच्या आकारा एवढेच टाकावे लागणार आहे.

महापालिकेकडे आकडेवारीच नाही

नगर शहरात किती दुकाने वा आस्थापना आहेत, याचे आकडे महापालिकेकडे नाहीत. महापालिकेच्या असलेल्या मार्केट विभागात मनपाच्या मालकीच्या इमारतींमधील गाळे, तसेच मनपाने बांधलेल्या विविध मार्केटमधील गाळ्यांची संख्या उपलब्ध आहे. ही संख्या सुमारे साडेसातशेच्यावर आहे. मात्र, अन्य खासगी दुकाने वा आस्थापनांची माहिती मनपाकडे नाही. महापालिकेकडे पूर्वी शॉप अ‍ॅक्ट लायसन्स देण्याचे काम असताना व त्यासाठी तो स्वतंत्र विभाग कार्यरत असताना तेथे शहरातील ज्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून शॉप अ‍ॅक्ट लायसन्स घेतले त्याची माहिती उपलब्ध होती. मात्र, मनपाकडील हा शॉप अ‍ॅक्ट लायसन्सचा अधिकार शासनाने काढून घेतल्याने हा विभागही बंद झाला आहे. त्यामुळे नगर शहरात नेमकी किती दुकाने व आस्थापना आहेत, याची माहिती मनपाकडे नाही.