आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक दी चेन:जिल्ह्यातील सर्व व्यवहार उद्यापासून होणार सुरू : मुश्रीफ

नगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार नगर जिल्ह्याचा समावेश टप्पा क्रमांक १ मध्ये असल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आदेश जारी करेल. मात्र, अद्याप कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आदींबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले. जिल्ह्यात बाधित रुग्णांचे प्रमाण घटत चालले आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. सध्या राज्य शासनाने ब्रेक दी चेन अंतर्गत जिल्ह्याच्या रुग्ण बाधित होण्याचा दर आणि त्या जिल्ह्यात ऑक्सीजन बेडसची उपलब्धता या निकषांवर काही निर्बंध शिथील करुन व्यवहार पुन्हा सुरु करण्याबाबत निर्देश जारी केले.

नगर जिल्ह्याचा गेल्या आठवड्यातील रुग्ण बाधित होण्याचा दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेडस वर असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सोमवारपासून सुरु करता येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आदेश जारी करेल, असे ते म्हणाले. तरीही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आदींचा वापर करणे आवश्यक आहे. पुन्हा बाधितांची संख्या वाढायला लागली तर जिल्ह्यात पुन्हा प्रतिबंध लागू करावे लागतील. त्यामुळे नागरिकांनी याबाबत काळजी घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन संभाव्य रुग्णवाढीनुसार नियोजन करावे लागणार आहे. त्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली.

यापुढील काळात जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे, असेही ते म्हणाले. आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्री साईबाबा विश्वस्त संस्थानचे कान्हुराज बगाटे, मनपा आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, आदी यावेळी उपस्थित होते.

ऑक्सिजन नसल्याचा फटका बसला
जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प नसल्याचा फटका आपल्याला बसला. वेगाने दुसरी लाट आली. ऑक्सिजन प्रकल्प आता ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी उभारले जात आहेत. त्याचे काम सुरु झाले आहे. शिर्डी श्री साईबाबा विश्वस्त संस्थानतर्फे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार आहे, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

म्युकरमायकोसीसचा धोका कायम
सध्या कोरोनाबरोबरच आता राज्यात म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून येत आहेत. आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत २२५ रुग्ण आढळले आहेत. त्यासाठी आवश्यक इंजेक्शन्स सध्या जिल्ह्यात उपलब्ध असले तरी अधिकची गरज लागणार आहे. त्यादृष्टीने ती मिळवण्यासाठी प्रयत्न आहे, असे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले.

  • ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत राज्य शासनाचे निर्देश, जिल्हा प्रशासन करणार आदेश जारी
  • कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कायम
  • नगरकरांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
बातम्या आणखी आहेत...