आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर शहरातील सावेडीतील प्रस्तावित स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा खरेदीचा 32 कोटी रुपये खर्चाचा ठराव किंवा या व्यवहाराशी भारतीय जनता पक्षाचा कुठलाही संबंध नाही. तसेच पक्षाचा या दोन्ही गोष्टीला विरोधच आहे. या सगळ्याला महापौरच जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधेे यांनी गुरुवारी (1 डिसेंबरला) केला.
याबाबत पत्रकात गंधे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव किंवा विषयाला व्यक्तिशः मी व भाजपाच्या नगरसेवकांनी कोणत्याही स्वरूपात पाठिंबा दिलेला नाही किंवा त्याचे समर्थनही केले नाही. उलटपक्षी या एकूणच विषयाला पक्ष म्हणून भाजप व पक्षाच्या नगरसेवकांचाही विरोधच केला आहे. हे ज्ञात असतानाही शहरात विनाकारण पक्षाची बदनामी केली जात आहे. महापालिकेत शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेस अशा महाविकास आघाडीची सत्ता आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून भाजप मनपात विरोधक म्हणून कार्यरत असून, ही भूमिका पक्षाने वेळोवेळी सक्षमपणे बजावली आहे. नागरिक किंवा मनपाच्या हिताला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य पक्षाने कधी केलेले नाही. त्यामुळे या विषयातही भाजप चुकीचे समर्थन कधीच करणार नाही.
महापौर हे मनपा सभेचे पीठासीन अधिकारी आहेत. सभागृहाच्या सभेचा अजेंडा व त्यातील कार्यवाही ही सर्वस्वी त्यांचीच असते. आताही सर्वसाधारण सभेत स्मशानभूमी व दफनभूमीचा विषय अजेंड्यावर घेण्याचा व त्यावर सभागृहात कार्यवाही करण्याचा अधिकार त्यांचाच आहे. त्यानुसार महापौरांच्याच निर्णयानुसार याबाबतची सर्व कार्यवाही झाली आहे. असे गंधे यांनी म्हटले आहे.
महापालिका आयुक्तांनी ठराव विखंडित करावा हा एकूणच विषय, संबंधित ठराव व त्यावरील सभागृहातील कार्यवाहीशी भाजपचा कुठलाही संबंध नाही. शिवाय या सगळ्या गोष्टींना भाजप व पक्षाच्या नगरसेवकांचा ठाम विरोध आहे.महापालिकेच्या आर्थिक हिताला बाधा आणणारा हा ठराव महापालिका आयुक्तांनी विखंडित करावा, अशी मागणीही गंधे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.