आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:केडगाव येथील एकाच जागेचे दोन संस्थांना वाटप

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केडगावमधील एकाच जागेचे महापालिकेने दोन सेवाभावी संस्थांना वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका संस्थेने जागेवर काम सुरू करण्याची तयारी केल्यानंतर दुसऱ्या संस्थेतून आक्षेप घेण्यात आला. वादावर तोडगा निघत नसल्याने अखेर हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी महापालिकेला पत्र देऊन माहिती मागवली आहे. तर दुसऱ्या संस्थेला त्याच सर्व्हे नंबरमध्ये पर्यायी जागा देऊन संत रोहिदास महाराज सेवा संघ या संस्थेला सदर भूखंड द्यावा, अनागोंदी कारभार करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या संस्थेचे सचिव नीलेश बांगरे यांनी केली आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ११ फेब्रुवारी २०१५ रोजी केडगाव येथील सर्वे नंबर ४९/२ व ५०/१ ब या मंजूर रेखांकनातील ३५६० चौरस मीटर खुली जागा संत रोहिदास महाराज सेवा संघ यांना रितसर ठराव करून समाज मंदिरासाठी दिली. मात्र, त्यानंतर पुन्हा १६ मार्च २०१६ रोजी सर्वसाधारण सभेने त्याच सर्वे नंबर मधील ३५६० चौरस मीटर खुली जागा पारनेर परिवार मित्र मंडळ या संस्थेस देण्याचा ठराव केला. मनपाने ठराव करून दोन वेगवेगळ्या संस्थांना एकाच सर्वे नंबर मधील जागा दिली. सुमारे ७७०० चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेतील कोणती जागा कोणत्या संस्थेला देण्यात आली, याचा उल्लेख ठरावात व करारात करण्यात आलेला नाही. मनपाच्या या चुकीमुळे आता दोन्ही संस्थांनी एकाच जागेवर दावा ठोकल्याने वाद निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी पारनेर परिवार मित्र मंडळ संस्थेने जागेवर काम सुरू करण्याची तयारी केली. त्याला पहिला ठराव झालेल्या संत रोहिदास महाराज सेवा संघाने आक्षेप घेतला. हा पोलिसांपर्यंत गेल्यावर कोतवाली पोलिसांनी महापालिकेला पत्र देऊन माहिती मागवली आहे. या वादातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे दोन संस्थांमध्ये वाद निर्माण झाला असून, दोषी कर्मचाऱ्यांना कारवाईची मागणी यांनी केली आहे. तसेच, पारनेर परिवार मित्र मंडळ या संस्थेला त्याच सर्वे नंबर मधील पर्यायी जागा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...