आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतमहोत्सव:तनपुरे बाबा पायी चारधाम पदयात्रेचा अमृतमहोत्सव

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर दलितांना खुले व्हावे यासाठी स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांनी केलेल्या उपोषणाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त समतेचा संदेश देण्यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पंढरपुरात तनपुरे बाबा मठात साने गुरुजींचे स्मारक साकारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण ८ नोव्हेंबरला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्टचे अध्यक्ष बद्रीनाथ महाराज तनपुरे, पद्मश्री पोपटराव पवार व साने गुरुजी स्मारक समितीचे अध्यक्ष राजा अवसक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रसंत तनपुरे महाराज यांच्या ३७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम होत आहे. वारकरी संप्रदायाने समतेचे तत्व सांगितले. परंतु पंढरपुरात १९४७ सालापर्यंत दलितांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. विठ्ठल मंदिराचे दरवाजे दलितांना खुले व्हावे यासाठी १ ते १० मे १९४७ असे दहा दिवस साने गुरुजींनी पंढरपुरात उपोषण केले. या उपोषणासाठी त्यावेळी त्यांना जागा मिळत नव्हती. मूळ अहमदनगर जिल्ह्यातील दगडवाडीचे असणारे राष्ट्रसंत कुशाबा तनपुरे यांनी पंढरपुरातील आपल्या मठात ती जागा दिली. त्यांनी या समतेच्या लढ्याला साथ दिली. या घटनेचेही हे अमृतमहोत्सवी वर्षे आहे. मात्र आजवर साने गुरुजींचे पंढरपुरात काहीही स्मारक नाही. या समतेच्या लढ्याचे स्मरण म्हणून राष्ट्र सेवा दल व साने गुरुजी प्रेमींनी साने गुरुजी स्मारक समिती निर्माण करून पंढरपुरात साने गुरुजींचे स्मारक साकारले आहे. या स्मारकासाठीही तनपुरे महाराज मठानेच जागा उपलब्ध करुन दिली आहे.

तनपुरे बाबांनी गाडगेबाबांच्या प्रेरणेतून पंढरपुरात अन्नदान सुरु केले. त्याही परंपरेला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय स्वातंत्र्याचेही हे अमृतमहोत्सवी वर्षे आहे. या सर्व घटनांच्या निमित्ताने पंढरपुरात ७ व ८ नोव्हेंबर रोजी हा समारंभ होत आहे. यात ७ नोव्हेंबर रोजी राज्यभरातून वारकरी दिंड्या व राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते पंढरपुरात येणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी स. ११ वाजता शरद पवार यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...