आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी:अमृतसागर दूध संघ निवडणुकीचा धुरळा शेतकरी हितासाठी की आमदारकीसाठी

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गावागावातील दूध उत्पादक संस्था व शेतकऱ्यांची शिखर संस्था अमृतसागर सहकारी दूध संघाच्या २०२२-२७ संचालक मंडळाच्या ८ जानेवारीस होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड यांचे समर्थक ३० उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती. पिचड पितापुत्राविरूद्ध आमदार डॉ. लहामटे हे विरोध कायम पाळणार असल्याचे समोर आल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेते व पदाधिकाऱ्यांना बिनविरोधचे मनसुबे गुंडाळले. बिनविरोध तहाला आमदार डॉ. लहामटे यांचा विरोध व अमृतसागर निवडणुकीचा उठलेला धुराळा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे की, २०२४ च्या संभाव्य आमदारकीच्या वर्चस्ववादातून उठला आहे? याचे चर्वितचर्वण राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अमृतसागर निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आमदार डॉ. लहामटे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर पार पडल्या. मात्र बिनविरोध निवडणुकीबद्दल आमदार डॉ. लहामटे यांच्याकडून तीव्र संताप व विरोध व्यक्त करून नकार घंटाच मिळाल्याने नाईलाजास्तव अमृतसागर दूध संघ संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही, याला अनेक पदाधिकाऱ्यांकडून पृष्टी मिळत आहे. अमृतसागर संचालक बिनविरोध निवडणूकीच्या तहाला राष्ट्रवादीचे आमदार डॅा. किरण लहामटे यांचा विरोध आहे. त्याचे उत्तर भविष्यातील २०२४ च्या विधानसभेत दडले आहे.

याचा धडा डॉ. लहामटे हे यापूर्वी पिचड पितापुत्राचे पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून आतापर्यंत २०१९ वगळून सलग सर्व निवडणूका लढलेले अशोक भांगरे यांच्या राजकारणातून घेत आहेत. ‘निवडणूक हरवल्यावर पुन्हा शिंग मोडून स्वाभिमान सोडून पिचडांसोबत बिनविरोध राजकीय सलगी करणे माझ्याकडून शक्य नाहीय. भले निवडणुकीत होईल ते होईल पण लोक आपल्याबद्दल तसे बोलायला नकोत, हेच कारण अमृतसागर निवडणूक बिनविरोध न करण्यामागील डॉ. लहामटे यांचे असावे. यामुळेच या निवडणुकीतून रथी महारथी पदाधिकाऱ्यांनी आपले अर्ज माघार घेत निवडणुकीतून अंग काढून घेणेच पसंत केले.

या निवडणुकीसाठी ८ जानेवारीस मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. १५ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत. तर उमेदवारांसह १३० मतदार मतदान करणार आहेत. आता ही निवडणूक माजी आमदारांसह विद्यमान आमदार डॉ. लहामटे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. यातील १०० मतदारांना वश करण्यासोबतच मोठा घोडेबाजार सुरू असल्यास आश्चर्य वाटणार नाही. निवडणुकीत सत्ताधारी वैभव पिचड व रावसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात आमदार डॉ. लहामटे व सीताराम गायकर अशी लढत मानली जात आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची व वादग्रस्त होईल, अशी शक्यता नाकारता येत नाही.

दूध संघाच्या निवडणुकीत हे प्रमुख उमेदवार रिंगणात
महाविकास आघाडीकडून अमृतसागरचे संभाव्य अध्यक्ष म्हणून प्रोजेक्ट करण्यात येणार म्हणून चर्चेत असलेले अगस्ति साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कैलास वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठल चासकर, विठ्ठल डुंबरे, जनलक्ष्मी पतसंस्था अध्यक्ष भाऊपाटील नवले, शिवसेनेचे नेते महेश नवले आदींसह अनेक प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...