आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊसमान:शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण; भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार

पारनेर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी पारनेर तालुक्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील मूग,बाजरी, सोयाबिन,वाटाणा तसेच मक्यासह इतर चारा पिकांना जीवदान मिळाले. या पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

तालुक्याची पावसाची भिस्त पूर्व मोसमी (अवकाळी) पावसावर आहे. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस फारसा झाला नाही. मृग नक्षत्रही कोरडेच गेले. रोहिणी नक्षत्राने मात्र साथ दिली. रोहिणी नक्षत्रात झालेल्या पेरणीलायक पावसामुळे तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. यात प्रामुख्याने मूग बाजरी सोयाबिन मका चारा पिके तसेच तालुक्याच्या पठार भागात मोठ्या प्रमाणावर वाटाण्याची पेरणी झाली.

तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावर वाटाण्याचे पीक घेण्यात आले.या पिकांना गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. निसर्गाने साथ दिली तर यंदाच्या खरीप हंगामात बऱ्यापैकी उत्पन्न मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.त्यामुळे शेतकरी आनंदले असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसातील पाऊस हा यावर्षीच्या पावसाळी हंगामात सर्वात जास्त पाऊस आहे.यापूर्वी जुलै महिन्यात भीज पाऊस झालेला असल्याने गेल्या दोन दिवसातील पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील ओढे नाले ओसंडून वाहू लागले आहेत.वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झालेल्या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी अडले आहे.जलसंधारणाच्या कामांचा या गावांना फायदा झाला असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...