आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकांद्याचे भाव पडले आहेत. शेतकरी उघड्यावर आला आहे. अशा स्थितीत राज्यातील भाजप सरकार मात्र कांदा व्यापार्यांचे हितसंवर्धन करण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी केला. दरम्यान, भाजपने शिंदे गटाशी केलेली युती महाराष्ट्राला रुचलेली नाही, त्यामुळे निवडणुका घ्यायला भाजप घाबरत आहे, असा दावाही पाटील यांनी केला. सावता परिषदेने आयोजित केलेल्या माळी समाज मेळाव्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष पाटील नगरला आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. पाटील म्हणाले, कांद्याचे भाव पडल्याने, शेतकरी अडचणीत आहेत. राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा सभागृहात याबाबत आवाज उठवला. त्यावेळी सरकारने थातूर मातूर उत्तर देऊन, समिती नेमण्याचे आश्वासन दिले. पण अशी समिती नेमून तिच्या बैठका होईपर्यंत लहान शेतकऱ्याला मिळेल त्या भावात कांदा विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे कांदा व्यापार्यांचे हितसंवर्धन करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे, असा आरोप पाटील यांनी केला. जातनिहाय जनगणना करण्याची ओबीसी समाजबांधवांची मागणी आहे व येथे झालेल्या सावता परिषदेतही तसा ठराव केला गेला आहे. राज्यातील ओबीसी समाजाचीही जात निहाय सर्वेक्षण व जनगणना होण्याची मागणी आहे. तिची दखल सत्ताधार्यांनी घेतली पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले.
निवडणुकांना भाजप घाबरतोय
महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवल्या तर मोठे यश व बहुमत या तिनही पक्षांचे होऊ शकेल. पण भाजप स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुका घेण्यास घाबरत आहे. त्यांच्या लक्षात आले आहे की, शिंदे गटा समवेत युती केलेली महाराष्ट्राला रुचलेली नाही, त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.