आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधीक्षकांचे आदेश:शहरातील फेल झालेल्या मॉकड्रील ची चौकशी ; अहवाल मागवला

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आशा टॉकीज चौकात घेण्यात आलेल्या दंगलीच्या ‘मॉकड्रील’मध्ये दंगल नियंत्रण पथकासह बहुतांशी पोलिस ठाण्याची पथके उशिराने घटनास्थळी पोहोचल्याच्या घटनेची पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दाखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांना दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (२६ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मॉकड्रील घेण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व रुग्णवाहिका काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर बऱ्याच वेळाने तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. मॉकड्रील जवळपास संपुष्टात आल्यानंतर भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलिस ठाण्याची पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिस मुख्यालयातील अतिरिक्त फौजफाटा, दंगल नियंत्रण पथकही वेळेवर घटनास्थळी पोहोचले नाही. या घडलेल्या प्रकारासंदर्भात पोलिस अधीक्षक पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

एखादी घटना घडल्यानंतर घटनास्थळी बंदोबस्त व इतर पोलिस ठाण्याकडून आवश्यक सहकार्य, मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत एक आदेश यापूर्वीच जारी करण्यात आलेला आहे. त्यानुसार अनुपालन झाले का, अधिकारी कर्मचारी वेळेवर का पोहोचले नाहीत, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक पाटील यांनी उपअधीक्षक अनिल कातकडे यांना दिले आहेत. पूर्वसूचना न देता शहरात पुन्हा मॉकड्रील घेण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...