आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोखंडी पूल जतन केला, तर शहराचे सौंदर्य आणखी वाढेल:नगरचा नावलौकिक वाढवण्याची लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांना संधी

अहमदनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या रूपानं नगरच्या "पूल वैभवा"त भर पडली आहे. या पुलापासून अवघ्या 100 मीटरवर असलेला लोखंडी पूल जतन केला, तर शहराचं सौंदर्य आणखी वाढू शकेल.महाराष्ट्रातील सर्वात जुना "झुलता पूल" नगरमध्ये आहे. 1869 ते 73 दरम्यान सीना नदीवर बांधलेला धनुष्याकृती कमानींचा भारतातील पहिला लोखंडी पूलही याच शहरात आहे. त्याचा एकही नट-बोल्ट अजून निखळलेला नाही.

नगर शहरात "झुलता पूल", "लकडी पूल" आणि "लोखंडी पूल" असे तीन वैशिष्ट्यपूर्ण पूल आहेत. दोन लोखंडी साखळदंडांच्या साहाय्याने 1832 मध्ये उभारलेला नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या खंदकावरील झुलता पूल हा अशा प्रकारचा महाराष्ट्रातील पहिलाच पूल. त्याचं रिस्टोरेशन आर्मी सध्या करत आहे. या पुलापासून काही अंतरावर भिंगार नाल्यावर लकडी पूल आहे. लष्करानं तो "हेरिटेज लिंक ब्रिज" म्हणून जतन केला आहे.

सीना नदीवरच्या धनुष्याकृती कमानी असलेला लोखंडी पूल पुढच्या वर्षी दीडशे वर्षांचा होईल. रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी आता शेजारीच नवीन पूल झाला आहे. त्यामुळे जुना ऐतिहासिक लोखंडी पूल जतन करून पादचारी व फिरायला येणार्‍यांसाठी "गार्डन ब्रिज" मध्ये त्याचं रूपांतर करायला हवं, अशी इतिहासप्रेमींची मागणी आहे.

सक्कर चौक ते जीपीओदरम्यान झालेल्या नवीन उड्डाणपुलावर शिवचरित्राबरोबरच नगरमधील ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक स्थळांची चित्रं रंगवली गेली, तर नगरचा पर्यटन विकास व्हायला मदत होऊ शकेल. निदान पर्यटनस्थळांकडे जाणारे सचित्र दिशादर्शक तरी पुलावर आणि पुलाखाली उभारायला हवेत.

विस्तारित अहमदनगर जिल्ह्याला या वर्षी, तर येथील न्यायालयाला पुढच्या वर्षी 200 वर्षे पूर्ण होत आहेत. 1822 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात नाशिकमधील वणी आणि सोलापूरमधील करमाळ्यापर्यंतचा प्रदेश समाविष्ट करण्यात आला. 1869 मध्ये ती गावे वगळल्यानंतरही अहमदनगर हा क्षेत्रफळानं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचा लौकिक टिकवून आहे.

अहमदनगरला मुन्सफ न्यायालय 1823 मध्ये, तर जिल्हा न्यायालय 1827 मध्ये सुरू झालं. न्यायालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव (150 वा वर्धापन दिन) मोठ्या उत्साहात 1972-73 मध्ये साजरा झाला होता. आता पुढच्या वर्षी 2023 मध्ये द्विशताब्दी साजरी करण्यासाठी पुरेसा अवधी असल्यानं आतापासून नियोजनबद्ध तयारी सुरू करायला हवी. यानिमित्तानं उत्तम स्मारक ग्रंथ प्रकाशित करून त्याद्वारे नगरचं नाव देशभर पोहोचवता येऊ शकेल. मात्र, त्या आघाडीवरही फारसा उत्साह दिसत नाही.

बातम्या आणखी आहेत...