आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा हजारेंचे शेवटचे उपोषण:30 जानेवारीपासून अण्णा हजारेंचे शेवटचे उपोषण, भाजप नेत्यांची 2011 मधील भाषणे देशभर व्हायरल करणार

पारनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन वर्षे उलटून गेली तरी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही, अण्णांचा आरोप

“सन २०११ मध्ये दिल्लीत रामलीला मैदानावर झालेल्या आंदोलनादरम्यान भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते संसदेत माझ्या समर्थनार्थ भाषणे ठोकत होते. माझ्या मागण्या कशा योग्य आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. माझे कौतुक करताना त्यांना शब्द अपुरे पडत होते. मग आता काय झाले? आश्वासने पूर्ण करणे तर सोडाच, माझ्या पत्रांनाही केंद्र सरकार, पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तरे दिली जात नाहीत. त्या वेळी संसदेत भाषणे केवळ सत्ता मिळवण्यासाठी होती का?’ असा जळजळीत सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. त्या भाषणांचे संकलन सुरू आहे. येत्या ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत अण्णा शेवटच्या उपोषणास बसणार असून त्या वेळी भाजप नेत्यांच्या भाषणांचे व्हिडिओ देशभर प्रसारित केले जाणार आहेत.

अण्णा हजारे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपण शेवटच्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे कळवले आहे. पत्रात म्हटले आहे, २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या उपोषणाच्या वेळी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी संवेदनशील आहे. शेतकरी हिताच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आहे. मागण्यांसंदर्भात कालबद्ध कार्यक्रमानुसार निर्णय घेण्यात येतील, असे लेखी आश्वासन पंतप्रधान कार्यालयाने दिले होते. मात्र, पुढे काहीही झाले नाही.

शेतकरी हिताच्या मागण्यांसंदर्भात विचार करण्यासाठी कृषितज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, भाज्या, फळे, दूध, फुलांची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात येईल, नाशवंत पिकांच्या साठवणुकीसाठी सहा हजार कोटी खर्च करून वातानुकूलित गोदामांची उभारणी करण्यात येईल, अशी आश्वासने देण्यात आली होती. तीन वर्षे उलटून गेली तरी त्यांची पूर्तता झालेली नाही. आजही शेतकऱ्यांना दूध, भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकून द्यावी लागतात. हे सहन होत नाही. वाईट वाटते, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...