आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या केडगाव शाखेतील बनावट सोने तारण कर्ज खात्यांची तपासणी वेगाने सुरू झाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या तपासणीत सुमारे सव्वादोन किलो बनावट दागिने आढळून आले. आतापर्यंत झालेल्या तपासणीत तब्बल अडीच किलो वजनाचे सोन्याचे बनावट दागिने आढळून आले आहेत. या माध्यमातून सोसायटीची ७९.१९ लाखांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
शहर बँकेपाठोपाठ नागेबाबा मल्टिस्टेटमध्येही बनावट दागिण्यांद्वारे सोनेतारण कर्ज प्रकरणे उघडकीस आली आहेत. दोन खात्यांमध्ये २२१ ग्रॅम बनावट दागिने आढळून आले होते. त्याद्वारे २ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद सोसायटीने दिली आहे. त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तपासादरम्यान सुमारे १५० ते २५० सोनेतारण कर्ज खाती असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी शाखेच्या कार्यालयात तळ ठोकून तपासणी सुरू केली.
शुक्रवारी झालेल्या तपासणीत आरोपी श्रीतेज पानपाटील, सुनील आळकुटे व संदीप कदम यांच्या ११ खात्यांमध्ये ८४० ग्रॅम बनावट दागिने आढळून आले. त्याद्वारे २८.६४ लाख रुपये कर्ज घेण्यात आले होते. तर इतर ११ आरोपींच्या २५ खात्यांमध्ये १४८१ ग्रॅम बनावट दागिने आढळून आले. त्याद्वारे ४७.७९ लाखांचे कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीचे २२१ ग्रॅम व शुक्रवारी आढळलेले २३२१ ग्रॅम असे एकूण २५४२ ग्रॅम वजनाचे बनावट दागिने आढळून आले आहेत. त्याद्वारे बँकेची ७९.१९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. इतर खात्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शहर बँक प्रकरणात कोठडीत असलेल्या तिघांना या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली असून त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नागेबाबा क्रेडिट सोसायटीला दिली तंबी
आरोपी गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाले याने तपासलेली कोणतीही सोनेतारण खाती पोलिसांना न कळवता परस्पर पैसे भरून घेऊन बंद करू नयेत, अशी तंबीही कोतवाली पोलिसांनी नागेबाबा क्रेडिट सोसायटीला दिली. नागेबाबा सोसायटीकडून काही सोनेतारण कर्ज खाती पैसे भरून घेऊन बंद करण्यात आल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. मात्र, खाती बंद झाली तरी त्याचीही तपासणी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.