आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रमुख घटक असलेल्या सिटीझन फीडबॅकमध्ये मनपाने १४ हजार नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. मात्र, नागरिकांना प्रश्न विचारून त्यावर त्यांची प्रतिक्रिया नोंदवण्याऐवजी नागरिकांकडून ओटीपी घेऊन कर्मचाऱ्यांनीच प्रतिक्रिया भरल्यामुळे ‘सिटीझन फीडबॅक’चा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
मागील दोन-तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात नगर शहराच्या मानांकनात सुधारणा होत आहे. मागील वर्षी देशात १० लाख लोकसंख्येखालील स्वच्छ शहरांमध्ये नगरला २२ वा क्रमांक मिळाला होता. तसेच कचरामुक्त शहरांच्या यादीत ‘थ्री स्टार’ मानांकनही मिळाले होते. या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या १० क्रमांकामध्ये व फाईव्ह स्टार मानांकन मिळवण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रत्यक्ष तपासणी व नागरिकांच्या प्रतिक्रिया या दोन महत्त्वाच्या घटकांवर सर्वाधिक गुणांकन दिले जाते. त्यामुळे सिटीझन फिडबॅक मिळवण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत. महापालिका कार्यालयात व इतर शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकडून प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. मात्र, नागरिकांना स्वच्छतेबाबत प्रश्न न विचारता केवळ मोबाईल क्रमांक विचारून त्यावर आलेला ओटीपी मागितला जातो व संबंधित कर्मचारीच नागरिकांची प्रतिक्रिया नोंदवत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मनपाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी शहरातील काही भागात नागरिकांच्या घरी जाऊनही प्रतिक्रिया नोंदवल्या. मात्र, नागरिकांच्या मोबाईलवरून या प्रतिक्रिया नोंदविल्या जाणे अपेक्षित असताना नागरिकांकडून केवळ मोबाईल नंबर घेऊन व ओटीपी मिळवून कर्मचाऱ्यांनीच या प्रतिक्रिया भरल्या. त्यामुळे मनपाने गोळा केलेल्या १४ हजार नागरिकांच्या प्रतिक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.