आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या आरोग्य आयुक्त पदावरून तुकाराम मुंढे यांची सरकारने तडकाफडकी बदली केली. मात्र, २ महिने उलटूनही नियुक्तीचे ठिकाण दिले नाही. त्यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करावे, या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन केले. मागणीचे निवेदन शिरस्तेदार श्रीकांत लोमटे यांनी स्वीकारले.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुकाराम मुंढे यांना आरोग्य खात्यात आयुक्तपदाची जबाबदारी दिली. मात्र, लगेचच त्यांची बदली केली. मुंढे यांनी आरोग्य खात्याचा कार्यभार हाती घेताच अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. खात्यात फेरबदल केले. मुख्यालयी न राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीसा बजावत सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे आदेश दिले. शासकीय रुग्णालयात डॉक्टरची उपस्थिती वाढवली. मोफत सुविधा देणाऱ्या ओपीडीचे तास वाढवले. रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यावर बंदी घातली.
आर्थिक लूट थांबविण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे जनतेने स्वागत केले. शासकीय रुग्णालयांचा कायापालट व नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांनी काम हाती घेतले. धडाकेबाज कामगिरीमुळे ते राजकारण्यांचे बळी ठरले.
अनेकदा त्यांच्या बदल्या झाल्या. गोरगरीब जनतेसाठी झटणाऱ्या या अधिकाऱ्याची पुन्हा आरोग्य आयुक्त पदावर नियुक्ती करावी, अशी मागणी शहराध्यक्ष सचिन साळुंके, तालुकाध्यक्ष संजय देशमुख, उपाध्यक्ष आप्पा गुंजाळ, असिफ शेख, अनिल खर्डे, संतोष जेधे, महिला आघाडीच्या फर्जना शेख, दीपक साळुंके, दत्ता चव्हाण आदींसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.