आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सीएमओ कक्षात पहिल्याच दिवशी महसूलसह पोलिसांबाबत अर्ज

बंडू पवार | नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न व समस्या लेखी स्वरूपात मांडता याव्यात यासाठी सोमवारी (१९ डिसेंबर) मंत्रालय धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय (सीएमओ) कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी या कक्षात महसूल व पोलीस विभागाच्या संबंधित नागरिकांनी दोन अर्ज दाखल केले. मुख्यमंत्रियों उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने या कक्षात स्वीकारून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. या कक्षासाठी नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, प्रशासकीय स्तरावरील कामे, अर्ज, निवेदने यासाठी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाला राज्यभरातून तक्रारी प्राप्त होतात. मंत्रालयातील सीएमओ कक्षाच्या धर्तीवर आता राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसे निर्देश १६ डिसेंबरला महसूल विभागाचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले आहेत. नागरिकांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडता यावेत व त्याची सोडवणूक व्हावी, यासाठी, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलीे. कक्षाचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहानिशा करूनच अर्जावर पुढील कार्यवाही
मुख्यमंत्री सचिवालय कक्षात नागरिकांना विविध विभागाच्या संबंधित प्रश्न ,समस्या मांडता येणार आहेत. नागरिकांनी समस्या लेखी अर्जाद्वारे या कक्षाला सादर केल्यानंतर संबंधित अर्जदाराची नोंद केली जाणार आहे. अर्जदाराला एक पोहोच पावती दिली जाईल. त्यानंतर आलेल्या तक्रारीची शहानिशा करून पुढील कार्यवाही केली जाईल.'' राजेंद्रकुमार पाटील, विशेष कार्य अधिकारी, सीएमओ कक्ष.

कार्यवाही अहवाल १० तारखेपूर्वी सादर करा
जिल्हाधिकारी कार्यालयातील सीएमओ कक्षात मुख्यमंत्रियों उद्देशून लिहिलेल्या अर्जावर जिल्हास्तरावरच कार्यवाही होणे अपेक्षीत आहे. प्राप्त अर्जाबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल निवासी उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयास दरमहा दहा तारखेपूर्वी सादर करावा, असे निर्देश आहेत.

अतिरिक्त अधिकारी नियुक्त
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात पुरवठा विभागाच्या नवीन सुधारित आकृतीबंधानुसार अतिरिक्त ठरलेले, महसूल अधिकारी व करमणूक कर विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असे आदेश मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी परिपत्रकात दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...