आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासवाटा:योजनेतील त्रुटी दूर, मिरी-तिसगाव योजनेसाठी 155 कोटींची मान्यता; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती

राहुरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होईल

जलजीवन मिशन योजनेतर्गत राहुरी विधानसभा मतदार संघातील मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी १५५ कोटी ५९ लाख रुपये खर्चाची तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे. लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

मिरी, तिसगाव व इतर ३१ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी मुळा धरणातून थेट पाणी पुरवठा केला जात आहे. या योजनेत नव्याने १२ गावांचा समावेश केल्याने मिरी-तिसगाव योजनेत ४३ गांवे १८६ वाड्या-वस्त्यांचा समावेश झाला. यासाठी लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून निविदा प्रक्रिया सुरू होईल, असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. या योजनेत वाढीव गावे समाविष्ट करण्यासाठी तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे यांनी पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत तब्बल १५ बैठका घेऊन योजनेतील त्रुटी दूर करण्यात आल्या. या योजनेविषयी विधानसभेत पहिला लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. योजनेच्या वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री तनपुरे यांनी म्हटले. मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी "मुळा धरणातून उचललेले शंभर लिटरपैकी अवघे २५ लिटर पाणी टेलपर्यंत पोहचते. लाभार्थी गावांना दोन ते तीन आठवड्याने पाणी मिळत असल्याने मुळा धरण ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान साडेसव्वीस किलोमीटर मुख्य जलवाहिनी जमिनीवर घेतली जाणार आहे. त्यासाठी चिचोंडीपासून तिसगावपर्यंत स्वतंत्र जलवाहिनी होईल. या पाणी पुरवठा योजनेत खांडगाव, जोहारवाडी, सातवड, कवडगाव, त्रिभुवनवाडी, निंबोडी, देवराई, घाटशिरस, शिरापूर, करडवाडी, पवळवाडी, डमाळवाडी ही नवीन १२ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मिरी-तिसगाव पाठोपाठ राहुरी तालुक्यातील सोनगाव-धानोरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला २७ कोटींची तांत्रिक मान्यता मिळाली. राहुरी शहराच्या २९ कोटी रुपये खर्चाच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. ब्राह्मणी व इतर सात गावे योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेची मुख्य जलवाहिनी प्लास्टिकऐवजी लोखंडी करून, चेडगाव व मोकळओहोळ या दोन गावांचा योजनेत नव्याने समावेश केला आहे, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

‘इडी’च्या भीतीला महाविकास आघाडी विकासातून उत्तरे देणार
राज्यातील महाविकास आघाडी शासन विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असताना राज्यातील विरोधक केंद्र सरकारच्या माध्यमातून ईडीची भीती दाखवण्यात व्यस्त आहेत. मात्र, विरोधकांच्या इडीला महाविकास आघाडी विकास कामातून उत्तरे देणार आहे, असे राज्यमंत्री तनपुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...